जळगाव जिल्ह्य़ाचे नेते सुरेश जैन यांना राजकारणाचे बळी बनविण्यात आले आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना सदैव त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही ठाकरे यांनी दिली.
पाचोरा येथे नगराध्यक्षा सुनीता पाटील आणि आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्यानिमित्त गुरुवारी आयोजित जाहीर सभेत ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची बाळासाहेब ठाकरे यांची मागणी होती. त्यानुसार आरक्षण दिले असते तर मराठा समाजावर आज ही वेळ आली नसती. शरद पवार हे केंद्रात मंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न का केले नाहीत, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला. सेनेच्या मंत्र्यांना दिलेले मंत्रिपद हे शोभेचे नाही. मंत्री झालात तरी आपल्या खान्देशच्या मुलुख मैदानी तोफेत पाणी जाऊ देऊ नका, असा सल्लाही त्यांनी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना या वेळी दिला.
मराठा आरक्षणासाठी मूक निदर्शने
पाचोरा येथे उद्धव ठाकरे जाहीर सभेसाठी आले असता मराठा समाजाचे अॅड. अभय पाटील, सचिन सोमवंशी, विकास पाटील आदींनी काळे झेंडे व मागण्यांचे फलक दाखविले. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींचा खटल जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अशा मागणीचे फलक त्यांच्या हातात होते. ठाकरे यांनी निदर्शकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत मागण्यांबाबत चर्चा केली.