Uddhav Thackeray : दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा मुंबईत दोन ठिकाणी पार पडला. एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी एक खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंवर केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी दोन दिवस ठेवला होता. तसंच त्यांच्या मृतदेहाचे ठसे घेण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
रामदास कदम यांनी काय आरोप केला होता?
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यावेळच्या काही घडामोडींचा उल्लेख करून खळबळ उडवून दिली आहे. ते त्यांच्या भाषणात म्हणाले “माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे. शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता? याची माहिती काढा. मी खूप जबाबदारीनं मोठं विधान करत आहे. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आजही विचारून घ्या. दोन दिवस शिवसेना प्रमुखांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी का ठेवला होता? अंतर्गत काय चाललं होतं? मी ८ दिवस तिथे खाली मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो. सगळं कळत होतं. हे सगळं कशासाठी?” असं रामदास कदम म्हणाले होते. त्यानंतर रामदास कदम यांना संजय राऊत आणि अनिल परब यांनी उत्तर दिलं आहे.
रामदास कदमांच्या आरोपांवर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही. ठाकरे म्हणजे काय आहेत सगळ्यांना माहीत आहेत. पण मी गद्दार आणि हरामखोरांना उत्तर देणार नाही. अशा प्रकारे आरोप झाल्यावर त्रास होतो का? हे विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, “होय, मला त्रास आणि वेदना नक्कीच होतात. पण शिवाजी पार्कमध्ये हजारो माणसं माझं भाषण थांबवू का विचारल्यावर तुम्ही बोला म्हणतात तेव्हा त्या या वेदनांवर रामबाण उपाय झाला आहे असं मला वाटतं. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात माझ्या पाठिशी आहेत. म्हणून तर मी उभा राहू शकलो आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.