Uddhav Thackeray on Ashish Shelar Press Conference on Errors in voter lists : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे व मविआने मुंबईत नुकताच ‘सत्याचा मोर्चा’ काढला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील कथित घोळ सिद्ध करणारे काही पुरावे व व्हिडीओ दाखवले. याला प्रत्युत्तर म्हणून आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली.
आशिष शेलार यांनी काही मुस्लीम मतदारांच्या नावांमधील घोळ दाखवले. यावरून त्यांनी राज ठाकरे व महाविकास आघाडीवर आरोप केला की विरोधक केवळ हिंदू मतदारांच्या नोंदींमधील घोळ दाखवून व्होट जिहाद करत आहेत.
शेलारांनी आम्हाला फुलटॉस दिला : उद्धव ठाकरे
आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेवर शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आशिष शेलार यांनी आम्हाला (विरोधक) फुलटॉस चेंडू टाकला आहे. मुळात त्यांनी आमचा आरोप मान्य केला आहे. मतदारयाद्यांमधील घोळ त्यांनी मान्य केले आहेत.” उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आशिषे शेलार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.
“शेलार व फडणवीसांमधील भांडणाचा परिपाक”
“मी आशिष शेलार यांचं जाहीर अभिनंदन करतो. त्यांनी नकळतपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे पप्पू ठरवलं आहे. सहसा भाजपात कोणी फडणवीसांविरोधात बोलण्याचं धाडस दाखवत नाही. परंतु, शेलार यांनी ते धाडस दाखवलं. हा कदाचित त्यांच्यातील अंतर्गत वादाचा परिपाक असेल. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि राज्यातील मतदार याद्या सदोष असल्याचं मान्य केलं. मुख्यमंत्री बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार करून, घसा कोरडा करून आलेले असतानाच शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना हे आरोपांचं अमृत पाजलंय.”
उद्धव ठाकरेंचा आशिष शेलारांना चिमटा
“आशिष शेलार यांनी सिद्ध केलं आहे की मतदारयाद्यांमध्ये गोंधळ आहेत. त्यांनी आमच्यावर टीका केली असली तरी आमचं एक तरी वाक्य असं दाखवा की ‘अमुक मतांमध्ये सुधारणा करा’. आम्ही निवडणूक आयोगाला म्हटलं की तुम्ही मतदारयाद्यांमध्ये सुधारणा करा. आम्ही संपूर्ण याद्यांमध्ये सुधारणा मागत आहोत. कदाचित आशिष शेलार यांची त्यांच्याबरोबर (मुस्लीम) उठबस असेल म्हणून त्यांना मुस्लीम मतदारांच्या सदोष नोंदी सापडल्या. आमची तिकडे उठबस नाही.”
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख म्हणाले, “आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे की संपूर्ण मतदारयाद्या सदोष असून त्यात सुधारणा करा. मतदारयाद्यांमध्ये सुधारणा होत नाहीत तोवर निवडणुका घेऊ नका. अशा स्थितीत शेलार यांनी आज जे धाडस दाखवलं ते कौतुकास्पद आहे.”
