Uddhav Thackeray Interview : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठीच्या मुद्यावरून चांगलाच वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारच्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात उद्धव व राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर दोघेही युती करतील अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यावर पुढे काहीच झालं नाही. दुसऱ्या बाजूला विधीमंडळात सरकारने जनसुरक्षा विधेयक मंजूर केलं आहे. याला विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. यासह विविध राजकीय विषयांवर शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ या त्यांच्या पक्षाच्या मुखपत्राचे संपादक तथा खासदार संजय राऊत यांच्याशी बातचीत केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “ठाकरे ब्रँड हा काही आम्ही तयार केलेला नाही. तो लोकांनी स्वीकारला आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर जनतेशी प्रामाणिक आहोत. ठाकरे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत, आपल्या वेदनेला निर्भीड वाचा फोडणारे आहेत, हे जनतेला माहित आहे म्हणून महाराष्ट्रातील जनता इतकी वर्षे आमच्याबरोबर आहे. ठाकरेंनी महाराष्ट्र, मराठी अस्मिता आणि हिंदू अस्मितेचं रक्षण करण्यासाठी नेहमीच काम केलं आहे. आमची ही ओळख अनेकांनी पुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, आमची ओळख पुसू इच्छिणारेच पुसले गेले.”
पक्ष हिरावला पण लोकांचं प्रेम कायम आहे : उद्धव ठाकरे
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “ठाकरे या ब्रँडमध्ये नेमकं काय आहे हे जनताच सांगू शकेल. माझ्याकडे आज काहीही नाही तरी देखील मी जिथे जातो तिथले लोक आपुलकीने स्वागत करतात, माझ्याशी बोलतात, सरकारविरोधातील संताप माझ्याकडे व्यक्त करतात, त्यांची हळूहळू व्यक्त करतात आणि मला सांगतात की कोणीही नसलं तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत.”
“ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी अनेक बँड वाजू लागले आहेत. त्यांना असं वाटतंय की आपल्याशिवाय या देशात दुसरं कोणीच नाही. हल्ली तर ते स्वतःची प्रत्यक्ष देवाबरोबर तुलना करू लागले आहेत. अशा लोकांबद्दल आपण काय बोलायचं. ज्यांच्याकडे काही नाही जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे हा ब्रँड लागतोय. स्वतः पोकळ आहेत स्वतः काहीच निर्माण केलं नाही. कधी कुठल्याही क्षेत्रात आदर्श निर्माण करता आलेला नाही.”
उद्धव ठाकरे म्हणाले, “त्यांना भले १०० वर्ष झाली असतील आणखी, काही वर्ष असतीलही, तरीदेखील ते राज्याला, देशाला काही देऊ शकले नाहीत. म्हणून ठाकरे हा ब्रँड चोरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ठाकरे ब्रँड चोरून आपण ठाकरेंचे (बाळासाहेब) कसे भक्त आहोत हे ठासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना ते दिसत आहेत.”