माझ्यावर सातत्याने एक टीका होते आहे की मी घरी बसून होतो. होय मी घरी बसून होतो पण मी कुणाची घरं फोडली नाहीत असा टोला आता उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला आहे. यवतमाळ दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपा हा बाजार बुणग्यांचा पक्ष आहे असं म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. अमरावतीत उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेतला. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपावर शरसंधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?

“माझ्यावर टीका केली जाते की मी इतके दिवस घरी बसून होतो. होय मी घरी बसून होतो पण मी कुणाची घरं फोडली नाहीत. घरफोडे तुम्ही (भाजपा) आहात. मला कितीही काहीही म्हणा की मी घरी बसून काम केलं. मी घरी बसून जे काम केलं ते तुम्हाला घरं फोडूनही करता येत नाही. त्यामुळेच तुम्हाला दारोदारी जातं आहे कारण कुणी दारातच उभं करत नाही. कुठे पोलिसांना बसवलं जातं आहे, कुठे शिक्षकांना कामं सोडून बसवलं जातं आहे.” असं म्हणत शासन तुमच्या दारी या मोहिमेवरही उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

हे पण वाचा- “मी पंतप्रधान झालो तर काय फरक पडणार?”, उद्धव ठाकरेंचा प्रश्न; म्हणाले, “आणीबाणीपेक्षाही …”

हे फोड आणि तो फोड हे जगातला मोठा पक्ष करतो आहे

आज तुमच्याकडे खोकेच्या खोके पडले आहेत, तुम्ही आमदार विकत घेत आहात असं मी ऐकलं आहे. त्यापेक्षा लोकांसाठी काम करा तुम्हाला कुणालाही विकत घ्यायची गरज लागणार नाही, मतंही विकत घ्यावी लागणार नाहीत. मात्र कामच करायचं नाही फक्त हे फोड आणि ते फोड आणि हे जगातला सर्वात मोठा पक्ष भाजपा करतोय. मी मुख्यमंत्री असताना नंबर वन होतो त्याप्रमाणेच आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगात नंबर वन आहेत. तरीही भाजपावर इतर पक्ष फोडण्याची वेळ का येते आहे? आधी शिवसेना फोडली, चोरली. आता राष्ट्रवादी पक्ष फोडला, जगातल्या सर्वात मोठ्या पक्षावर ही वेळ का आली? दोन शब्द यांच्यासाठी आहेत एक आहे तो मस्ती आणि दुसरा आहे आत्मविश्वास. भारतीय जनता पक्षाला सत्तेची मस्ती आली आहे, पण त्यांच्यात आत्मविश्वास नाही. आपण मोठे झालो, सत्ताधीश झालो तरीही धाकधूक ही आहे की आपण निवडून येणार नाही. त्यामुळे समोर कुणी ठेवायचंच नाही हे भाजपाचं धोरण आहे.

हे पण वाचा- “अजित पवारांना व्हिलन केलं जातंय, दादा मोठे नेते…”; रोहित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “भाजपा एसीमध्ये बसून…”

मर्दाची अवलाद असाल तर..

विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर केला जातो आहे. पोलिसांतर्फे नोटीसा दिल्या जात आहेत. मर्दाची अवलाद असाल तर या यंत्रणा जरा बाजूला ठेवा असंही आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं आहे. आज अमरावती शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तसाच महाराष्ट्रही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तुम्हाला कुणी ओळखत नव्हतं तेव्हा शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला खांद्यावर बसवून मोठं केलं असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. आमच्या खांद्यावर बसवून मोठे झालात आणि आज आम्हाला संपवायला निघालात? हे तुमचं हिंदुत्व आहे? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams bjp about shivsena and ncp said i didn not broke anyone houses scj