शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहचले आहेत. भाई जगताप यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसह आम्ही लढणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यानंतर पाडव्याच्या संध्याकाळी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहचले आहेत. राज ठाकरे महाविकास आघाडीचा भाग होणार का? या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु असतानाच आता भाई जगताप यांचं म्हणणं समोर आलं आहे. त्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.
भाई जगताप यांनी काय म्हटलंय?
‘आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरे तर सोडा, आम्ही उद्धव ठाकरेंबरोबरही निवडणुका लढणार नाही’, असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीत बिघाडीच्या चर्चांनी जोर धरला आहे. भाई जगताप यांनी काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार असल्याचे थेट संकेतच दिले आहेत. भाई जगताप यांनी हे विधान आयएएनएसशी बोलताना केलं आहे. एकीकडे भाई जगताप यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली असतानाच उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या आजपर्यंतच्या भेटीगाठी कधी झाल्या?
१) ५ जुलै २०२५ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या विजयी मेळाव्यात एकत्र आले. दोघांचीही भाषणं झाली. एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
२) २७ जुलै २०२५ : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
३) २७ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे गणपती दर्शनसाठी राज ठाकरेंच्या घरी सहकुटुंब भेटले. ज्यावेळी ठाकरे कुटुंबाचा स्नेहभोजन कार्यक्रम हा राज ठाकरेंच्या घरी म्हणजेच शिवतीर्थ या ठिकाणी पार पडला.
४) १० सप्टेंबर : उद्धव ठाकरे हे अनिल देसाई आणि संजय राऊत यांच्यासह राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते. तिथे आपण मावशीशी चर्चा करायला गेलो असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
५) ५ ऑक्टोबर : संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर पोहचले आणि त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेही पोहचले दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
६) १२ ऑक्टोबर : राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवसास्थानी त्यांच्या मातोश्रींसह आणि संपूर्ण कुटुंबासह पोहचले. ठाकरे कुटुंबांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.
७) १७ ऑक्टोबर : राज ठाकरेंच्या मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. ठाकरे कुटुंबियांचं फोटो सेशन
८) २२ ऑक्टोबर : उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी