“मुख्यमंत्री असताना स्वतः अडीच वर्षे काहीही केलं नाही. आता या हे द्या त्याला ते द्या असं म्हणत आहेत. तसंच आम्ही संपाला पाठिंबा देऊ असंही म्हणत आहेत. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. सत्ता गेल्याने तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पद गेलं आणि वेड्यासारखे बडबडू लागले आहेत” असं वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. निलेश राणे यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांवरही स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.
नारायण राणे यांची वैभव नाईक यांच्यावरही टीका
नारायण राणे दोन महिन्यांमध्ये राजीनामा देतील असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केली होती. या टीकेलाही नारायण राणेंनी उत्तर दिलं आहे. “भविष्य सांगणारा वैभव नाईक मला भेटायला आला होता. त्यावेळी त्याने कान पुढे केला असता तर कानफटात मारली असती. माझा पक्ष आज सत्ते आहे. सत्तेत ठेवायचा आहे. मोदी सरकारमध्ये ४२ ते ४५ खासदार निवडून पाठवायचे आहेत. आम्ही आता त्या तयारीला लागलो आहोत” असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
निलेश राणेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुडाळमध्ये शिवगर्जना महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आमदार वैभव नाईक यांच्यावर तोफ डागली. शिवरायांचं नाव घेऊन राज्य केलं. मात्र, फितुरी करुन आजही इतिहास उजळला जातो. सहकाऱ्यांवर, लोकांवर विश्वास ठेवता येत नाही. आता पायाखालची वाळू सरकली, पद गेलं आणि उद्धव ठाकरे वेड्यासारखे बडबडू लागले असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
निलेश राणे आणि नितेश राणे ही दोन्ही मुलं महाराष्ट्रात भाजपच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. मला त्यांच्या कार्याबद्दल, कर्तृत्वाबद्दल गर्व आहे असंही राणे यांनी म्हटलं आहे.
