दोन्ही बाजूंच्या समुद्रांवरील वाऱ्यांच्या खेळामुळे राज्याच्या बऱ्याचशा भागाला गुरुवारी व शुक्रवारी ऐन हिवाळ्यात वादळी पावसाने तडाखा दिला. कोपरगावसह काही भागात गारपीट झाली. हा पाऊस दुष्काळी मराठवाडय़ाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. पुण्यात शुक्रवारी रात्री कोसळलेल्या ३४.५ मिलिमीटर पावसामुळे बहुतांश रस्ते जलमय झाले आणि येथील प्रसिद्ध सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सव मध्येच आवरता घ्यावा लागला. हा पाऊस आणखी दोन दिवस कायम राहील, असा अंदाज हवांमान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
फोटो गॅलरी: अस्मानी सुलतानी
गारपिटीचा सर्वाधिक तडाखा नाशिक जिल्ह्य़ाला बसला. निफाड, देवळा, नांदगाव, येवला, दिंडोरी व बागलाण या तालुक्यांना शुक्रवारी पुन्हा पावसाने झोडपले. त्यामुळे सुमारे १८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसला. प्रशासनाने पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले. दरम्यान, राज्य शासन नुकसानग्रस्तांना मदत देताना प्रांतवाद करीत असल्याचा आरोप करत निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी भ्रमणध्वनी मनोऱ्यावर चढून सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीस व महसूल विभागाने मध्यस्ती करत आंदोलकांना खाली उतरविले. धुळे व जळगाव जिल्ह्य़ांनाही या अवकाळी पावसाचा तडाखा बसला.
शेतीवर परिणाम काय?
आंबा, द्राक्षे यांसारख्या फळपिकांसाठी हा पाऊस नुकसानकारक आहे. त्याच्यामुळे नाशिक, सांगली भागातील द्राक्षाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाडय़ाच्या दृष्टीने हा पाऊस फायदेशीर आहे. विशेषत: तेथील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर तेथील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पाऊस पडलेले चांगलेच आहे. त्याचा रब्बीच्या पिकांनाही उपयोग होऊ शकतो.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र अशा दोन्ही बाजूंनी वारे येत आहे. हे वाऱ्यांचे प्रवाह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ावर एकमेकांना भिडले आहेत. त्याचा परिणाम म्हणून या भागावर हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आताचा पाऊस पडत आहे.
– पुणे वेधशाळा
‘सवाई महोत्सव’ला स्थगिती
‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे तात्पुरता स्थगित करण्यात आला. महोत्सव आता जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये पुन्हा घेण्यात येणार असून सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे संयोजकांनी जाहीर केले.
*कोपरगाव तालुक्यातील काही गावांना गारपिटीचा मोठा तडाखा बसला.
*अवकाळी पावसामुळे फळबागा, द्राक्षे, डाळिंब, पेरू, गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
*मालेगाव व सटाणा तालुक्यात गारपिटीत १२ शेतमजूर जखमी झाले. तर चांदवड, येवला, बागलाण तालुक्यात डाळिंबसह गहू, कांदा, पपई आदी फळांचे नुकसान झाले.
*काही ठिकाणी उघडय़ावर पडलेले पीव्हीसी पाइप, शाळेचे सिमेंटचे पत्रे, घरावरील सोलर यंत्रणा आणि घरांची कौले फुटली.
*नाशिकमध्ये द्राक्षबागांचे १०० टक्के नुकसान गृहीत धरून द्राक्षे, डाळिंब, पेरू ज्वारी आदींबाबतची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
आंबापीक धोक्यात : कोकणात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आंबापीक धोक्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गुरुवारपासून अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे थंडी गायब झाली असून मोहोर धरू लागलेल्या आंबापिकाला मात्र धोका निर्माण झाला आहे.