भाजपाने महायुतीमधील सहकारी पक्षांना विश्वासात न घेतल्यामुळे राज्यात आज ही परिस्थिती ओढावली आहे. यामुळे शिवसेना अस्वस्थ झाली व त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जोपर्यंत शिवसेना युतीतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत यावर तोडगा निघणार नाही, असे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

राज्यात सध्या सत्ता स्थापनेवरून जोरादार हालचाली सुरू आहेत. भाजपा व शिवसेना दोन्ही पक्ष आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. शिवाय विविध मार्गांचा अवलंब करून एकमेकांवर दबाव देखील आणला जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना सरकार स्थापन करणार असल्याचा चर्चा सुरू आहेत. तर भाजपाने अद्यापही आमची दारं चर्चेसाठी खुली असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमची विरोधी पक्षांची भूमिका असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी देखील आम्ही जनमताचा कौल मान्य करून विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असल्याचे म्हटलेले आहे.

निवडणुकीपूर्वीच सत्तेत समसमान वाटा यावर सहमती झाली होती. आता भाजपाला शिवसेना कोणताही नवा प्रस्ताव पाठवणार नाही. राष्ट्रपती राजवट जर महाराष्ट्रात लागू झाली तर हा अधर्माचा विजय असेल असं देखील शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. निवडणूक निकाल लागल्यापासून शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण झालेला आहे. सत्तेच्या समसमान वाटपाच्या मागणीवर शिवसेना ठाम आहे. तर शिवसेनेने चर्चेची दारं बंद केली आहेत, त्यामुळे आम्हीही वेट अँड वॉचच्याच भूमिकेत आहोत असं भाजपाने जाहीर केलं आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत आज दिले आहे. “आमचा फॉर्म्युला ठरला आहे. जी नाराजी आहे. ती दूर होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे सरकार आमचंच येणार असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी उद्या राज्यपालांची भेट घेणार आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.