दापोली : खेड तालुक्यातील तरुण आणि उत्साही राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले वैभव खेडेकर अखेर भाजपात दाखल झाले आहेत. बराच काळ चर्चेत राहिलेला त्यांचा पक्षप्रवेश मंगळवारी मुंबई येथे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला.
मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर रंगली होती. दोन वेळा हा प्रवेश पुढे ढकलला गेला होता; मात्र अखेर आज त्यांनी औपचारिकरित्या कमळ हाती घेत भाजपमध्ये प्रवेश केला.या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खेडेकर यांचे स्वागत करत त्यांच्या कार्याची दखल घेतली. “भाजप हा विकासाभिमुख पक्ष असून, तरुण कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे. वैभव खेडेकर यांच्या सहभागामुळे खेड तालुक्यात पक्ष अधिक मजबूत होईल,” असे चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.
वैभव खेडेकर यांनीही या प्रसंगी प्रतिक्रिया देताना सांगितले, “खेड तालुक्याच्या विकासासाठी ठोस भूमिका मांडण्यासाठी मी भाजपच्या विचारधारेत सहभागी होत आहे. पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या दिशेने कार्यरत राहणार आहे.”
राजकीय वर्तुळात या प्रवेशामुळे आगामी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला बळकटी मिळेल, अशी चर्चा आहे. खेड तालुक्यातील स्थानिक संघटनांमध्ये नवचैतन्य येण्याची शक्यता व्यक्त होत असून, खेडेकर यांच्या पुढील राजकीय रणनीतीकडे आणि त्यांना मिळणाऱ्या जबाबदारीकडे खेडवासीयांचे लक्ष लागले आहे.