उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथे केलेल्या भाषणात राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. तसंच वीर सावरकर हे आमचं श्रद्धास्थान आहे आम्ही त्यांचा अपमान सहन करणार नाही असं राहुल गांधींना उद्देशून म्हटलं आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर सातत्याने टीका होते आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही टीका केली. आम्ही वीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. तर महाराष्ट्र भाजपाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुठल्या घटनांवर ते गप्प राहिले याचा पाढाच भाजपाने वाचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे भाजपाने ट्विट केलेल्या व्हिडीओत?

उद्धव ठाकरे यांना सत्ता गेल्यानंतर अनेक जुन्या गोष्टींची ओढ लागली आहे. अडीच वर्षे त्यांना मुंबईतील निवासस्थान सोडून महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये जाणं गरजेचं वाटलं नाही. पण सत्ता गेली, पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं तसे खडबडून जागे होत महाराष्ट्रभर सभा घेण्यास सुरूवात केली. घरबश्या माणसाने घराबाहेर पडणं सकारात्मक असलं तरीही त्यांच्या भाषणांमध्ये नावीन्यपूर्ण काहीच नाही. नेहमीसारखी सहानुभूती मिळवण्यासाठीची केविलवाणी धडपड.

तुमची उद्विग्नता तुमच्या भाषणातून दिसते

पक्षातील लोकांनी उद्धव ठाकरेंच्या वागणुकीला, बदललेल्या भूमिकेला कंटाळून पक्ष सोडल्याने त्यांच्यात आलेली उद्विग्नता हे सगळं त्यांच्या भाषणाचं सार असतं. मालेगावच्या सभेत आवाहन करत त्यांनी विचारलं की मी सत्तेत असताना हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं? या आवाहानंतर त्यांना त्यांच्या सत्ताकाळातील घटनांचा साक्षात्कार करणं आवश्यक आहे.

हिंदुत्वाशी फारकत घेतलेल्या घटनांचा भाजपाने वाचला पाढा

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालघरच्या साधूंचा निर्घृण खून झाला.

करोनाच्या निमित्ताने सगळ्या सर्व हिंदू सणांना निर्बंध लावण्यात आले.

ईद असताना मूक संमतीने हे निर्बंध शिथील केले गेले. कारण तेव्हा बाजार फुलले होते. ईदसाठी बाहेर पडलेल्यांवर कुठलीही कारवाई होत नव्हती.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत यांनी अयोध्येतल्या करोना काळ होईपर्यंत राम मंदिराचं काम थांबवावं असा सल्लाही दिला होता.

राम मंदिर भूमिपूजनाचं निमित्त साधून अनेक ठिकाणी मंदिरात लोकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

मुंबईत उद्धव सेनेने अजान पठण स्पर्धा भरवल्या. विभाग प्रमुख सकपाळने तर अजान ही महाआरतीसारखी आहे असं वक्तव्य केलं.

मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रय़त्न करणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांना राजद्रोहाच्या कलमाखाली अटक करण्यात आली, तुरुंगात धाडण्यात आलं.

हिंदूंचा क्रूर छळ करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देण्यात आलं.

पुण्यात हिंदूंना सडका समाज म्हणणाऱ्या शरजील उस्मानीला मोकाटपणे जाऊ दिलं.

उद्धव ठाकरे तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर आता देव वाटू लागले आहेत. कारण तुमची सत्ता गेली. पक्ष तु्म्हाला सोडून गेला. महाविकास आघाडीची सत्ता नशा असल्यापासून राहुल गांधी वीर सावरकरांबाबत अत्यंत गलिच्छ भाषेत वक्तव्य करत आहेत. पण तुम्हाला एकदाही त्यावर बोलावंसं वाटलं नाही. उद्धवराव एक नाही तर अशा अनेक घटना आहेत जिथे तुम्ही हिंदुत्व फक्त सोडलंच नाहीत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खुश करण्यासाठी तुम्ही हिंदूविरोधी वागलात. शिवसेना हा फक्त राजकीय पक्ष नव्हता. शिवसेना ही स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार होता ज्याच्याशी तुम्ही सत्तेच्या लालसेपोटी प्रतारणा केली. तो विचार घेऊन शिवसैनिक बाजूला पडले आणि महायुती सरकारमध्ये आले. तुम्ही एका समुदायाचं लांगुलचालन करण्याच्या नादात आता हिंदुत्ववादीही राहिला नाहीत. ‘मी हिंदुत्वापासून दूर झालो अशी एक घटना तरी दाखवून द्या’ अशी आवाहनं करण्याची दुर्दैवी वेळ तुमच्यावर आली. ती वेळ तुमच्यावर आली ती हिंदू विरोधी गैर कृत्यांमुळेच. असं म्हणत हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

भाजपा महाराष्ट्राने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आता या सगळ्याला उद्धव ठाकरेंकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veer savarkar was remembered by uddhav thackeray only because he lost the maharashtra power said bjp scj