केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जळगावात झालेल्या एका कार्यक्रमात विकासाची ब्लू प्रिंटच मांडली आहे. संबंधित कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासह देशात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा दिला. एकट्या जळगाव जिल्ह्यात एकूण पंधरा हजार कोटी रुपयांची कामं पूर्ण केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच अजून १५ हजार कोटींची कामं होणं बाकी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपूर्ण राहिलेल्या कामाबद्दल बोलताना गडकरींनी सांगितलं की, जळगावातील विकास कामांमध्ये अनेक अडचणी आल्या. करोना संसर्गामुळे बरीच कामं मंदावली. तर काही ठिकाणी कंत्राटदार पळून गेले. पण जळगाव जिल्ह्यातील अनेक कामं सध्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. २०१४ साली भाजप सत्तेत आला तेव्हा जळगावात १८८ किमीचा राष्ट्रीय महामार्ग होता. पण मी आता ४०९ किमीचा राष्ट्रीय महामार्ग घोषित केला आहे.

“गेल्या सात वर्षात जळगावात ६ हजार कोटी रुपयांची एकूण १० कामं मंजूर करण्यात आली होती. यातील पाच कामं पूर्ण झाली असून पाच कामं प्रगती पथावर आहेत. यामध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांना जोडणारा चौपदरी मार्गाचा देखील समावेश आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातून जाणार आहे. याशिवाय बडोदा ते दिल्ली महामार्गाला जळगाव शहर जोडलं तर, जळगाव ते दिल्ली हा प्रवास केवळ १० ते ११ तासांत पूर्ण करता येईल”, असंही गडकरी यावेळी म्हणाले.

येणाऱ्या काळात वाहनं, विमानं, रेल्वे, विविध कंपन्या पाण्यातून निघणाऱ्या ग्रीन हायड्रोजनवर चालणार आहेत. दिल्लीत माझ्याकडे देखील अशाप्रकारची गाडी असून ती पाण्यातून निघणाऱ्या ग्रीन हायड्रोजनवर चालते. त्यामुळे देशात पाण्यातून ग्रीन हायड्रोजन तयार करण्यावर काम सुरू आहे. यामुळे भारत हा ऊर्जा आयात करणारा देश नव्हे, तर ऊर्जा निर्यात करणारा देश बनेल. परिणामी भारताला नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल यासारखी इंधनं आयात करावी लागणार नाही. देशातील शेतकरी केवळ अन्नदाताच नव्हे, तर उर्जादाता देखील बनेल, असंही गडकरी यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicles will run on hydrogen from water nitin gadkari statement in jalgaon rmm