विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरूवात केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रचार सभांचा धडाका लावला असून, मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालयीन शिक्षणाबाबत मोठी घोषणा केली. “पुन्हा सत्तेत आल्यावर महाविद्यालयीन शिक्षण मोफत देणार,” अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

विधानसभा निवडणुकीचा प्रचारात रंग भरू लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करण्यात कोणतीही कसर सोडत नसल्याचं दिसत आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिले आहे.

उद्धव ठाकरे हे गुरूवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. औरंगाबाद, वैजापूर, कन्नड आणि घनसावंगीत त्यांच्या प्रचार सभा झाल्या. यावेळी बोलताना ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. “अनेक विद्यार्थी हुशार आहेत. पण गरिबीमुळे ते महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत नाही. आम्ही पुन्हा सत्तेत आल्यावर या गरीब विद्यार्थ्यांची दैना होऊन देणार नाही. त्यासाठी पुन्हा सरकार आल्यावर महाविद्यालयीन शिक्षण मोफत देणार,” अशी घोषणा ठाकरे यांनी केली.

यावेळी ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले,”हे सरकार पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं शरद पवार सांगत आहे. होय, हे खरे आहे. शरद पवार यांना सरकार पाडण्याचा दांडगा अनुभव आहे. वसंतदादांचे सरकार पवारांनीच पाडलं होतं. पण आता हा अनुभव कामी येणार नाही. कारण आमची युती भक्कम आहे, असा टोला ठाकरे यांनी पवारांना लगावला.

शिवसैनिकांसमोर डोकंही टेकवेन-

“युतीचा धर्म पाळताना निष्ठावंतावर अन्याय झाला आहे. हे सगळे माझे सोबती आहे. त्यांची मी माफी मागण्यात चुकीचे काही नाही. औरंगाबादमध्ये एक गट उपोषणाला बसला. मी तिथे गेलो. गुडघ्यावर बसून त्यांचं म्हणणं मी ऐकलं. लगेच दुसऱ्या दिवशी बातमी आली. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसमोर गुडघे टेकले. अरे ही माझी माणसं आहेत ना. शिवसैनिकांसमोर गुडघेच काय मी डोकंही टेकवेन. त्यात मला काहीही गैर वाटत नाही,”असं ठाकरे यावेळी म्हणाले.