पंढरपूर : पूरग्रस्त नागरिकांना आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती महावस्त्रे वाटप करणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत समिती १ कोटी रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देणार असल्याची माहिती समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. सध्या समिती पूरग्रस्त नागरिकांना अन्नाचे पाकीट,लाडू, पिण्याच्या पाण्याची बाटली वाटप करत आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत तसेच सामाजिक उत्तरदायित्व व मानवतावादी भूमिकेतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती मुख्यमंत्री साहाय्यता निधीस एक कोटी रुपयांची मदत देणार आहे. याबाबत मंदिर समितीची नुकतीच दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेश कुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड. माधवीताई निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते. त्याचबरोबर पूरग्रस्त नागरिकांना श्रींच्या प्रसादरूपाने महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी सांगितले.

मंदिर समिती प्रत्येकवेळी पूरग्रस्त नागरिकांना खाद्यपदार्थांच्या पाकीटांचे वाटप करीत असते. यावेळी जिल्हा प्रशासनास देखील आवश्यक ती मदत करण्यात येत असून, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंदिर समितीकडून यापूर्वीही राज्यावर आलेल्या आपत्तीच्या काळात मदत केली गेली आहे. विशेष म्हणजे सन २०१३,२०१५,२०१८ आणि २०२० या काळातही मंदिर समितीमार्फत मुख्यमंत्री साहाय्यता निधीस प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. एकंदरीत पूरग्रस्तांच्या मदतीला ‘विठ्ठल’ धावला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या कृपेने संकटकाळात समाजाच्या सेवेसाठी पुढे येणे हीच खरी विठ्ठलभक्ती आहे. पूरग्रस्तांना मदत करणे ही मंदिर समितीचे सामाजिक व नैतिक कर्तव्य असून या आपत्तीमध्ये मंदिर समितीमार्फत प्रशासनास आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. या पूर्वी देखील समितीने मदत केली होती, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.