गेल्या दोन आठवड्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात नागरिकांची प्रचंड धांदल उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ आणि गडचिरोली याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर आता महाराष्ट्रात पावसानं काहीशी उसंत घेतली आहे. पण पुढील तीन दिवसात राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. आगामी ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याच्या शक्यता असून पुढील तीन दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार असल्याचं होसाळीकर यांनी सांगितलं आहे.

आज गोंदिया आणि वाशीम जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या २२ जिल्ह्यांना हवामान खात्याने पिवळा इशारा (येलो अलर्ट) जारी केला आहे. येत्या काही तासांत संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- मुंबईच्या जलसाठ्यात ७९ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने दिलासा

पुढील दोन दिवस महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. सोमवारी (१८ जुलै) रोजी गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद हे चार जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात सोमवारी पिवळा इशारा देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weather forecast in maharashtra imd give yellow alert to 22 districts and orange alert for gondia and washim rmm