Uddhav Thackeray on Alliance With Raj Thackeray: मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले. त्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये मनोमिलन झालेले पाहायला मिळाले. कौटुंबिक कार्यक्रम, गणेशोत्सव यानिमित्त दोन्ही बंधूंनी एकमेकांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. मात्र मागच्या आठवड्यात झालेल्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासह राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यानंतर लवकरच दोघांची युती जाहीर होणार, अशी चर्चा होती. त्यावर आज उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.
राज ठाकरेंच्या घरी मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरेंनी जवळपास अडीच तास वेळ घालवला. याबद्दल प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरे गमतीत म्हणाले की, मी नाही गेलो किंवा गेलो तरी चर्चा होते. नेमकी अडचण माझ्या लक्षात येत नाही. मी गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरेंच्या घरी गेलो. माझ्या वाढदिवसाला ते इथे मातोश्रीवर आले होते. आम्ही किती मोदक खाल्ले याचीही माध्यमात चर्चा झाली.
राज ठाकरे शिवसेनेच्या (ठाकरे) दसरा मेळाव्यात दिसणार का? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “ते येतील, पण माध्यमांनी जरा थांबावे…” राज ठाकरेंच्या घरी मागच्या आठवड्यात भेट देण्याचे कारण सांगताना ते म्हणाले, मावशी (राज ठाकरेंची आई) मला घरी येत रहा, असे मागच्या वेळी म्हणाली होती. त्यामुळे आमचे आता असेच येणे-जाणे सुरू आहे.
अधिकृत युती कधी जाहीर करणार?
राज ठाकरेंशी अधिकृत युती कधी जाहीर करणार? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “लवकरात लवकर याची घोषणा करण्यात येईल.” यानंतर त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र करत पत्रकार परिषद हसत हसत संपवली.
पंतप्रधान मोदी माझे शत्रू नाहीत?
उद्या (१७ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. पंतप्रधानांना वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा देणार? असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदी माझे शत्रू नाहीत. ते मला शत्रू मानत असतील पण मी त्यांना शत्रू मानत नाही. पण ते ज्या पद्धतीने शिवसेना संपवायला निघाले आहेत, हे राजकारण आम्ही सहन करू शकत नाही. त्यांच्या मनात पाप असले तरी मी त्यांना शुभेच्छा देतो की, त्यांना सर्व गोष्टींचे आकलन व्हावे आणि उरलेल्या टर्ममध्ये त्यांनी चांगले काम करावे.