अलिबाग : अनंत चतुदर्शीनंतर पितृपक्षाची सुरुवात होते. पंधरा दिवस श्राध्दविधी केले जातात. हा कालावधी पितरांबाबत आदर भावना व्यक्त करण्याचा असतो. त्यामुळे या काळात दान, धर्म, महालय श्राध्द तसेच तर्पण विधी केले जातात. त्यामुळे या काळात धार्मिक विधी करणे टाळावे असे सांगितले जाते. मात्र कोकणात गणेशोत्ससव नंतर येणाऱ्या भाद्रपद वैद्य चतुर्थीला एक गणेशोत्सव साजरा केला जातो. ज्याला गौरा गणेशोत्सव अथवा साखर चौथीचा गणेशोत्सव असे संबोधले जाते. आज पासून या गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे.
रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यक्षेत्रात २८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ९२८ गौरा गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे.या शिवाय नवी मुंबई पोलीस दलाच्या हद्दीत पनवेल आणि उरण परिसरात पाचशेहून अधिक साखर चौथीच्या गणपतींची स्थापना केली जाणार आहे. कुठे दीड दिवस, कुठे तीन दिवस तर कुठे पाच दिवस हा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. तळ कोकणात साखरचौथीच्या गणेशोत्सव साजरा होत नसला तरी उत्तर कोकणात हा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, पेण, अलिबाग आणि रोहा तालुक्यात साखर हा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
साखर चौथीच्या गणेशोत्सवाला सुरूवात कशी झाली ?
पेण तालक्यात गणेशमूर्ती बनविण्याचे काम वर्षभर सुरू असते. दरवर्षी ४० लाखांहून अधिक गणेशमूर्ती तालुक्यातील साडे पाचशेहून अधिक कार्यशाळांमध्ये तयार केल्या जातात. त्या देशा विदेशात पाठवल्या जातात. यातून शंभर कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे भाद्रपद महिन्यातील मुख्य गणेशोत्सव मूर्तीकार आणि व्यवसायिकांना साजरा करता येत नाही. त्यामुळे गणेशोत्सवानंतर येणाऱ्या पहिल्या चतुर्थीला पेण गणेशाची स्थापना मूर्तीकारांनी सुरू केली. नंतर ही परंपरा आसपासच्या परिसरात सुरू झाली. गणेशोत्सव काळात पंधरा दिवस कार्यशाळा बंद असते. साखर चौथीचा गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर मूर्तीकार पूढील वर्षाच्या मूर्ती कामाची सुरुवात होते. त्यामुळे साखर चौथीच्या गणेशोत्सव पेणच्या मूर्तीकारांसाठी महत्वाचा असतो.
उत्सवप्रिय कोकणात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. गणपतीला कोकणवासीय आपले आराध्यदैवत मानतात. या निमित्ताने गणेशाची प्रतिष्ठापना केली जात असते. पण घरगुती गणेशोत्सवाच्या व्यापक स्वरुपामुळे सार्वजनिक गणेशोत्सव फारसा साजरा केला जात नाही. हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी अलिकडच्या काळात साखरचौथीच्या सार्वजनिक गणेशोत्सवांचे आयोजन मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे या गणेशोत्सवाला कुठलेही धार्मिक अधिष्ठान नाही मात्र तरीही सामाजिक अधिष्ठानाच्या जोरावर साखरचौथीच्या गणेशोत्सवांची संख्या वाढत चालली आहे. आपल्या घरीही गणपती आणावा अशी इच्छा गणेशभक्तांची असते. एकत्र कुटूंब पध्दतीमुळे पण बरेचदा गणेशभक्तांना ते शक्य होत नाही. याला पर्याय म्हणून साखर चौथीच्या गणपतींची स्थापना केली जाते. काही जण नवस फेडण्यासाठी साखर चौथीच्या गणेशाची प्रतिष्ठापना करतात.
अनंत चतुदर्शीनंतर पितृपक्षाची सुरुवात होते. पंधरा दिवस श्राध्दविधी केले जातात. त्यामुळे पितृपक्षात गणेशाची स्थापना करावी अथवा नाही याबाबत जाणकारामध्ये मतभिन्नता आढळते. पण गणपती हा अधिनायक असल्याने त्याचे पूजन करताना गणेशभक्त पितृपक्षाचा फारसा विचार करत नाहीत. गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून त्याची मनोभावे आराधनाही करतात. या निमित्ताने भव्य देखावे, आरास केले जातात. विवीध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. आकर्षक रोषणाई केली जाते. ढोल ताशांच्या गजरात गणरायाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणूका पार पडतात.