Uddhav Thackeray : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच राज्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. तसेच यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी एक मोठं विधान केलं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र का आले? यांच कारण उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ‘मी (उद्धव ठाकरे), शरद पवार आणि काँग्रेस एकत्र का येऊ शकलो? तर आमच्या सर्वांमध्ये देशप्रेम हा एक समान धागा आहे’, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“मला आता एक क्षणभर प्रश्न पडला की मी डावा की उजवा? अर्थात दोन्ही हात आपलेच असतात. त्यामुळे डावं आणि उजवं असं काही करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. मला जेव्हा या कार्यक्रमासाठी फोन आला तेव्हा मी कार्यक्रमासाठी हो सांगितलं. मात्र, त्यावेळी मी त्यांना आणखी एक गोष्ट सांगितली. आपण हे आता दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा बोलत आहोत. हा कायदा किती वाईट आहे किंवा या कायद्याचा दुरुपयोग कसा केला जाईल किंवा दुरुपयोग केला जाऊ शकतो, हे जोपर्यंत आपण सर्वसामान्य माणसांना पटवून देऊ शकत नाहीत, तो पर्यंत या कायद्याच्या विरोधात जनसामान्यांमधून उठाव होणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“काही दिवसांपूर्वी मी एक मुलाखत पाहिली होती, त्या मुलाखतीत शेवटी सांगितलं होतं की हा कायदा अयोग्य आहे. त्यामुळे अशी जी काही माणसं आहेत, म्हणजे ज्यांना कायद्यांची माहिती आहे. आम्ही बोललो तर सत्ताधारी काय म्हणणार की तुम्ही विरोधक आहात तुम्ही विरोधात बोलणारच. हो आम्ही विरोधक आहोत, पण आम्ही तुमच्या सडलेल्या मानसिकतेच्या विरोधात आहोत. देशाच्या किंवा राज्याच्या विरोधात नाही. आम्ही देखील भारतीय जनता पक्षाबरोबर २५ ते ३० वर्ष फुकट घालवली. तेव्हा आमच्या समोर तुम्ही (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) होतात, शरद पवारही होते.”

“बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं नातं सर्वांना माहिती आहे. मतभेद टोकाचे आणि मैत्री तर त्याच्याही पलिकडची. म्हणजे थोडक्यात काय तर राजकारणात मतभेद आहेत, पण मतभेदाला मी मतभिन्नता म्हणतो. मतभिन्नता असू शकते. आता कोणी म्हणेल की डाव्यांच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे कसे? कारण शिवसेना आणि कम्युनिस्ट असाही संघर्ष झालेला आहे. मात्र, कालांतराने कळतं की आपण ज्या कारणासाठी लढतो ते बाजूलाच राहतं आणि आपण उगाचच भांडतो. राजकारणामध्ये व्यक्तिगत द्वेष, सूड असता कामा नये. त्यामुळेच मी (उद्धव ठाकरे), शरद पवार आणि काँग्रेस एकत्र का येऊ शकलो? तर आमच्या सर्वांमध्ये देशप्रेम हा एक समान धागा आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.