सावंतवाडी : गेल्या महिनाभरापासून सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत धुमाकूळ घालत असलेला आणि एका शेतकऱ्याचा बळी घेणारा ‘ओंकार’ हत्ती सध्या बांदा परिसरात आहे. मात्र, या हत्तीच्या बाबतीत दोन संतापजनक घटना समोर आल्या आहेत. बांद्यात हत्ती केळीच्या बागेत शिरला असता, एकाने त्याला थापट मारले तर दुसऱ्या घटनेत दांडक्याने मारहाण केल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे.

​दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे ‘ओंकार’ हत्तीने एका शेतकऱ्याला तुडवून ठार मारले होते. या गंभीर घटनेनंतर शासनाने या हत्तीला पकडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ओंकार’ हत्ती दोडामार्ग तालुक्यातून नेतर्डेमार्गे गोव्यातील मोपा परिसरात १४ दिवस फिरून परत सावंतवाडी तालुक्यातील कास, सातोसे, मडुरा, रोणापाल, इन्सुली आणि आता वाफोली, भालावल, ओटवणेमार्गे बांदा परिसरात दाखल झाला आहे.

मागील महिनाभरापासून हा हत्ती मानवी वस्तीजवळ वावरत असतानाही, तो काहीसा ‘माणसाळल्यासारखा’ वागत असल्याचा गैरसमज बाळगून काही नागरिकांनी हे अघटित कृत्य केले असावे. एका गंभीर हल्ल्यात शेतकऱ्याचा जीव घेतलेला असतानाही, नागरिक त्याच्या अगदी जवळ जाण्याचे आणि त्याला मारहाण करण्याचे धाडस कसे करत आहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

​प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

​ओंकार हत्तीने मनुष्यहानी केल्याचे सत्य माहीत असूनही, वनविभागाकडून त्याला पकडण्याच्या कार्यवाहीला इतका विलंब का होत आहे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांनी हत्तीला मारहाण करण्यासारखे गंभीर आणि धोकादायक कृत्य करणे, तसेच दुसरीकडे वनविभागाच्या कार्यवाहीतील दिरंगाई, या दोन्ही बाबी मनुष्य आणि वन्यजीव या दोघांसाठीही धोक्याची घंटा आहेत. वनविभागाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन, हत्तीला पकडण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.