अलिबाग : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (6 ऑक्टोबर) मुंबईत नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीनंतर रायगड जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगर पंचायतींमधील राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १६ पैकी १० ठिकाणी महिलांना नगराध्यक्ष म्हणून संधी मिळणार आहे. आजच्या सोडतीमुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला असून त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच स्थानिक राजकीय वर्तुळात चैतन्य निर्माण झाले आहे. कोणत्या नगरपरिषदेला कोणता प्रवर्ग मिळतो, यावर निवडणुकीत उमेदवार निवड, पक्षनिहाय रणनीती आणि युती-आघाड्यांचे स्वरूप ठरत असते. त्यानुसार आज नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ज्या ठिकाणी अनपेक्षित आरक्षण आले आहे तेथे नवीन उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे.
महिलांना मोठी संधी
यावेळच्या सोडतीत नगराध्यक्षपदासाठी महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळाली आहे. रायगड जिल्हयातील 10 नगरपालिकांपैकी 6 ठिकाणी नगराध्यक्षपदे विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखून ठेवण्यात आली आहेत. त्यात मुरूड जंजिरा, कर्जत, रोहा, उरण, पेण आणि अलिबाग यांचा समावेश आहे. तर 6 नगर पंचायतींपैकी 4 ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे. खालापूर, पाली, पोलादपूर आणि म्हसळा या चार नगरपंचायतींवर महिला राज असणार आहे. या ठिकाणी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पुरूष उमेदवारांचा पुरता हिरमोड झाला आहे.
असे आहे आरक्षण नगर परिषद
1) अलिबाग – सर्वसाधारण महिला
2) पेण – सर्वसाधारण महिला
3) उरण- सर्वसाधारण महिला
4) मुरूड जंजिरा – ओबीसी महिला
5) कर्जत – ओबीसी महिला
6) रोहा – ओबीसी महिला
7) महाड – नागरीकांचा मागास प्रवर्ग
8) श्रीवर्धन – नागरीकांचा मागास प्रवर्ग
9) खोपोली – सर्वसाधारण
10) माथेरान – सर्वसाधारण
नगरपंचायत
1) खालापूर – ओबीसी महिला
2) पाली – अनुसूचित जमाती महिला
3) माणगाव – अनुसूचित जमाती
4) तळा – नागरीकांचा मागास प्रवर्ग
5) पोलादपूर – ओबीसी महिला
6) म्हसळा – सर्वसाधारण महिला