लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या १ जून रोजी शेवटच्या सातव्या टप्प्याचं मतदान होणार असून ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे यंदा निकालाचं चित्र काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांवरही मतदान पूर्ण झालं आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील राजकीय स्थिती कमालीची गुंतागुंतीची झाल्यामुळे महाराष्ट्रातील निकाल नेमका काय असेल? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यासंदर्भात वेगवेगळे दावे प्रतिदावे होत असताना आता राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी मोठा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगेंद्र यादव यांनी नुकताच ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, महाराष्ट्रात एनडीएला कमीत कमी २० जागांचं नुकसान होईल, तसेच ४ जूनच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे कुठेही दिसणार नाही, असं विधान त्यांनी केलं.

हेही वाचा – मोदींनी प्रचारात ‘मंदिर’, ‘मुस्लीम’ शब्द किती वेळा उच्चारले? महागाई, बेरोजगारीचा शून्य उल्लेख; काँग्रेसचा आरोप

नेमकं काय म्हणाले योगेंद्र यादव?

“महाराष्ट्रातील निवडणुकीदरम्यान खरा मुद्दा हा असली शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणती हा होता. ज्यावेळी पाचव्या टप्प्यात मुंबईतील मतदान पार पडलं, त्यावेळी तर हे स्पष्ट झालं. या निवडणुकीत शिंदे पिछाडीवर होते. तसेच असली राष्ट्रवादीच्या मुद्द्यावरही शरद पवारांचा गट आघाडीवर होता”, अशी प्रतिक्रिया योगेंद्र यादव यांनी दिली.

“गेल्या निवडणुकीत एनडीएला एकूण ४२ जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत एनडीएन २२ पेक्षा जास्त जागा मिळणार नाही, असा माझा अंदाज आहे. एनडीएचं ज्या २० जागांवर नुकसान होताना दिसत आहे. त्यापैकी भाजपाचे नुकसान केवळ ५ जागांचे आहे. तर १५ जागांचे नुकसान घटक पक्षांचे होणार आहे”, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना, “या निकालानंतर शिंदे आणि अजित पवार यांची परिस्थिती वाईट होईल. या निकालानंतर ते कुठेही दिसणार नाही. तुम्ही शोधत राहाल पण तुम्हाला ते सापडणार नाही”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – Lok Sabha Exit Poll 2024 Date: एक्झिट पोल कधी जाहीर होणार? वेळ, दिवस सगळं काही जाणून …

काही दिवसांपूर्वी देशभरातील निकालाबाबत वर्तवलं होतं भाकीत

दरम्यान, योगेंद्र यादव यांनी काही दिवसांपूर्वी देशात भाजपा व एनडीएची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पीछेहाट होईल, असं भाकीत वर्तवलं होतं. यंदाच्या निवडणुकीत एनडीएला तब्बल ९० ते १०० जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे, असं ते म्हणाले होते. याशिवाय भाजपाला जवळपास ७० जागांचा फटका यंदा बसू शकतो, असा अंदाजही त्यांनी वर्तवला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या जागा ३०३ वरून २३३ वर येण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले होते. दुसरीकडे भाजपाच्या एनडीएतील मित्रपक्षांनाही ३५ जागा मिळतील. त्यामुळे एनडीएचा या निवडणुकीतला आकडा २६८ च्या आसपासच पोहोचू शकतो असं योगेंद्र यादव यांनी सांगितलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogendra yadav statement on ajit pawar eknath shimde maharashtra loksabha result spb