Yogesh Kadam Gun License to Sachin Ghaywal : कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन याला शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याची माहिती उघडकीस आली आहे. यावरून शिवसेनेचे (ठाकरे) नेते अनिल परब यांनी कदम व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांनी योगेश कदमांना इतकं अभय का दिलं आहे? मुख्यमंत्र्यांचे हात कोणत्या दगडाखाली आहेत? असा प्रश्न परब यांनी उपस्थित केला.

अनिल परब म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना कायम पाठिशी घालून राज्यातील जनतेला संदेश दिला आहे की मंत्र्याने काहीही केलं तरी चालतं. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खेड (रत्नागिरी) येथे जाऊन लोकांसमोर म्हणाले, ‘योगेश काहीही झालं तरी मी तुझ्या पाठिशी आहे.’ तेव्हापासून गृहराज्यमंत्र्यांनी राज्यात थैमान घातलं आहे. त्याचा पुरावा समोर आला आहे. पुण्यातील गँगवॉरला त्यांचंच पाठबळ असल्याचं सिद्ध झालं आहे.”

अनिल परब यांची टीका

अनिल परब म्हणाले, “पुण्यात गुंडांच्या ७० टोळ्या कार्यरत आहेत. खून, खंडणी, दरोडेखोरी, खुनाचे प्रयत्न असे प्रकार सर्रास घडत आहे. हे करायला सरकारचं पाठबळ आहे. त्यामुळे कुख्यात गुंड नीलेश घायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन देश सोडून पळून गेला. त्याचा भाऊ सचिन बन्सिलाल घायवळ याचा शस्त्रपरवाना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंजूर केला आहे. मुळात अनेक प्रकारच्या चौकशा व तपासण्या केल्यानंतर शस्त्रपरवाना दिला जातो. परंतु, गुंड नीलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ, ज्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याला योगेश कदम यांनी सहज शस्त्रपरवाना देऊन टाकला.”

सचिन घायवळ सज्जन?

“सचिन घायवळ याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न व खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला शस्त्रपरवाना दिला नाही. त्यानंतर गृहराज्यमंत्र्यांकडे याप्रकरणी सुनावणी झाली. कारण गृहराज्यमंत्र्यांकडे अर्धन्यायिक अधिकार असतात. कदम यांनी सुनावणी घेऊन सचिन घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना त्याला शस्त्रपरवाना दिला. न्यायालयाने त्याला पुराव्यांअभावी मुक्त केलं आहे. कारण त्याने साक्षीदारांना न्यायालयापर्यंत येऊ दिलं नाही. त्यानंतर त्याने गृहराज्यमंत्र्यांकडे शस्त्रपरवाना मागितला. यावर सुनावणी घेताना योगेश कदमांनी सचिन घायवळला सज्जन म्हणत शस्त्रपरवाना देऊन टाकला.”