Advertisement

“२३ किल्ले दिले पण…”; पूरग्रस्तांना वाटण्यात आलेल्या सामानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख

अहमदनगरमधील तरूणांच्या या अनोख्या उपक्रमाचं अभिनेता भरत जाधव याने कौतुक केलंय. म्हणाला, "छत्रपती महाराजांपेक्षा मोठं ऊर्जा स्रोत..."

सध्या रायगड, चिपळूण, सिंधुदुर्ग व कोकणातील अन्य इतर भागांत अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने, संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेकांची घरे पाण्याखाली गेली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. महापुरामुळे संकटात सापडलेल्या कोकणातील बांधवांना संकटातून सावरण्यासाठी आता अहमदनगरकरांनी मदतीचा हात पुढे केलाय. गृहोपयोगी वस्तूंची मदत पुरवण्यासोबत कोकणवासियांना पुन्हा नव्या उमेदीनं राहता यावं यासाठीचा एक खास उर्जामंत्र देखील देण्यात आलाय. अहमदनगरमधील तरूणांच्या या अनोख्या उपक्रमाचं अभिनेता भरत जाधव याने कौतुक केलंय.

अभिनेता भरत जाधव याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या कौतुकास्पद उपक्रमाअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंच्या पाकिटाचा आणि त्यावर लिहिलेल्या संदेशाचा फोटो शेअर केलाय. अभिनेता भरत जाधव याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये पाकिटावर कोकणवासियांना दिलासा देणारा एक उर्जामंत्र लिहिलाय. “कधीही हार मानू नका. छत्रपती शिवरायांना आधी २३ किल्ले द्यावे लागले. परंतु त्यानंतर ३५० किल्ल्याचं साम्राज्य निर्माण केलं. त्यामुळे कधीही हार नका”, असा उर्जामंत्र त्या पाकिटांवर लिहून कोकणवासियांना पुन्हा उमेदीने उभं करण्यासाठी मदत करत आहेत. अहमदनगरमधील तरूणांनी एकत्र येत हा उपक्रम सुरू केलाय. नगरमधील तरूणांचा हा अनोखा उर्जामंत्र अभिनेता भरज जाधव याला भावला असून त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत कौतुक केलंय.

“अहमदनगरमधील काही मुलांनी कोकणात जाऊन काही गृहोपयोगी वस्तूंचे किट वाटले. चांगली गोष्ट आहे. पण या पेक्षा मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी वाटप केलेल्या किट वर स्वतःचे नाव,नंबर किंवा फोटो न छापता असे प्रेरणादायी ऊर्जा मंत्र छापले. महाराजांपेक्षा मोठं ऊर्जा स्रोत आणखीन कुठलं असेल..!!! स्तुत्य उपक्रम” असं लिहित अभिनेता भरत जाधव याने अहमदनगरमधील तरूणांचं कौतुक केलंय.


नगरमधील तरूणांच्या या अनोख्या उपक्रमाचं सोशल मीडियावर भरपूर कौतुक केलं जातंय. तसंच खास उर्जामंत्र लिहिलेल्या गृहपयोगी वस्तूंच्या पाकिटांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून पाकिटावर फोटो आणि नाव लिहून सोशल मीडियावर टाकून ‘चमकोगिरी’ करणाऱ्यांपुढे नवा आदर्श निर्माण केलाय.

21
READ IN APP
X
X