This south indian Film Was Shot In Just 24 Hours : दाक्षिणात्य चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ असते. त्यांच्या चित्रपटातील सादरीकरण, कथा, संस्कृती यांमुळे प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांकडे ओढले जातात. पण, तुम्हाला माहीत आहे का, असा एक दाक्षिणात्य चित्रपट आहे, ज्याचं संपूर्ण चित्रीकरण फक्त एका दिवसात पूर्ण करण्यात आलं होतं.
१९९९ मध्ये ‘सुयमवरम’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झालेला,ज्याला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळालेलं. चित्रपटातील कथानक आणि कलाकारांची निवड यांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना विशेष भावलेला. गमतीची बाब म्हणजे हाच तो चित्रपट, जो फक्त २४ तासांत शूट झाला होता आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.
तब्बल ‘इतक्या’ कोटींची केलेली कमाई
विकिपीडियाच्या माहितीनुसार ‘सुयमवरम’ हा एक तमीळ चित्रपट आहे. ज्याची निर्मिती व लेखन गिरीधरीलाल नागपाल यांनी केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. २५ कोटी इतकं या चित्रपटाचं बजेट होतं; पण या चित्रपटानं एकूण ५० कोटींची कमाई केलेली.
या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार या चित्रपटाची मेकिंगची प्रोसेस वेगळी होती. त्यामध्ये १४ दिग्दर्शक, १९ छायाचित्रकार आणि ३० महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा समावेश होता. तमीळ इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार यामध्ये झळकले असून, २४ तासांत या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं.
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार या चित्रपटाची कथा कुसेलन विजयकुमार आणि त्यांची पत्नी सुशीला यांच्या अवती भोवती फिरते, ज्यांना तीन मुलं आणि सहा मुली असतात. त्यांच्या कुटुंबात त्यांचा मदतनीस आणि डॉक्टर यांचाही समावेश असतो.
चित्रपटाच्या सुरुवातीला कुसेलन यांच्या ६० व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन असल्याचं पाहायला मिळतं, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यांची प्रकृती गंभीर असते. त्यांच्याकडे फार वेळ राहिलेला नसतो. त्यांच्या शेवटच्या दिवसांत कुसेलन त्यांची शेवटची इच्छा व्यक्त करतात. त्यांची शेवटची इच्छा अशी असते की, त्यांना त्यांच्या सर्व मुलांची लग्न झालेली पाहायची असतात. त्याला कुटुंबीय होकार देतात. पुढे कुटुंबीय अशी जाहिरात काढतात की, जी व्यक्ती कुसेलन यांच्या कोणत्याही एका मुलाशी लग्न करायला तया होईल, त्याला एक कोटी रुपये देण्यात येतील. हा चित्रपट विनोद, भावनिकता ड्रामा यांनी भरलेला आहे.
