नवी दिल्ली : दिल्लीच्या विज्ञान भवन येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मंगळवारी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. शाहरूख खान, राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सी यांचा अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्यामध्ये लोकप्रिय चित्रपटांचा दबदबा दिसून आला.

राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा ऑगस्टमध्ये करण्यात आली होती. विधू विनोद चोप्रा यांच्या ‘१२वी फेल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. तर करण जोहर आणि अपूर्व मेहरा यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’साठी सर्वोत्तम लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार स्वीकारला. ‘द केरल स्टोरी’साठी सुदिप्तो सेन यांचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरव करण्यात आला.

शाहरूख खान (जवान), राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे) आणि विक्रांत मेस्सी (१२वी फेल) यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. चार दशकांच्या कारकिर्दीमध्ये ३६०पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारणारे मोहनलाल यांना उभे राहून उपस्थितांनी मानवंदना दिली. तर शाहरूख खान आणि राणी मुखर्जी यांच्यासाठी टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. या सोहळ्याला माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव हेही उपस्थित होते.

मला असे समजले की, मोहनलाल यांचे नाव दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आले तेव्हा लोकांमध्ये आनंदाची लाट पसरली. त्यांनी असंख्य लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवले आहे, हे त्यावरून दिसते. – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

मराठीचा ठसा ‘आत्मपॅम्फ्लेट’साठी आशिष बेंडे यांना पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला. ‘नाळ २’मधील त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना उत्कृष्ट बालकलाकार म्हणून कौतक झाले. प्रादेशिक भाषा श्रेणीमध्ये मराठी भाषेसाठी ‘श्यामची आई’ची निवड करण्यात आली होती.