आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचे पती प्रमोद प्रभुलकर यांची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ऑनलाईन माध्यमाद्वारे हॉटेलचे बुकींग करताना ही फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्रमोद प्रभुलकर यांनी ही घटना नेमकी कशी घडली याबद्दल सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओत प्रमोद प्रभुलकर यांच्याबरोबर एक महिलाही दिसत आहे. या व्हिडीओत त्या महिलेचीही १ लाख ६० हजारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या व्हिडीओत त्यांनी हे हॉटेल शिवसेना नेते रवींद्र फाटक यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले आहे. तसेच गेल्या १५ दिवसांपासून या घटना घडत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रवींद्र फाटक यांनी याप्रकरणाची दखल घ्यावी आणि आम्हाला पैसे परत मिळवून द्यावे, अशी मागणी प्रमोद प्रभुलकर यांनी केली आहे.
आणखी वाचा : ‘आई कुठे काय करते…’ फेम मधुराणी प्रभुलकरच्या पतीची फसवणूक, हजारोंचा गंडा

प्रमोद प्रभुलकर नेमकं काय म्हणाले?

“नमस्कार मी प्रमोद प्रभुलकर आणि मी डॉ. मीना विनय बर्दापूरकर, ठाणे… आम्ही आता ग्रीनलीफ रिसॉर्ट, गणपतीपुळे, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आहोत. या हॉटेलच्या बाबतीत आमची फसवणूक झालेली आहे. आमचे त्यात पैसे गेलेले आहेत. माझे १७ हजार रुपये हे एका भलत्याच अकाऊंटला गेलेले आहेत. तर मीना यांचे १ लाख ६० हजार एका वेगळ्याच अकाऊंटला गेलेले आहे. आमच्याकडे याचे सर्व व्यवहार केलेल्याची पावती आहे.

आम्ही गुगलवरुन या हॉटेलची वेबसाईट बघितली. तिथून आम्हाला जो नंबर सापडला त्यावरुन आम्हाला जो अकाऊंट नंबर आला त्यावर आम्ही पैसे पाठवले. पण आम्ही दोघेही जेव्हा या ठिकाणी आलो, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की हे पैसे आमच्याकडे पोहोचलेले नाहीत.

गेल्या १५ दिवसांपासून यांच्या या हॉटेलमध्ये अनेक फसवणुकीच्या घटना घडलेल्या आहेत. माझी आणि मीना ताई यांची आताच ओळख झाली. त्यांनी सायबर क्राईम आणि इतर सर्व ठिकाणी तक्रार दाखल केली आहे. पण अन्यायाला वाचा फुटली पाहिजे म्हणून या व्हिडीओद्वारे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. थोडक्यात इतकंच की याची दाद आम्हाला मिळाली पाहिजे.

या रिसॉर्टचे मालक शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक हे आहेत, असं आम्हाला इथे समजलं. हे हॉटेल त्यांच्या मालकीचे आहे, असे आम्हाला कळलं. त्यांच्याशी आम्ही संपर्क करण्याचा, हॉटेल व्यवस्थापनाकडे फोन नंबर मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आम्हाला तो दिलेला नाही. ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ते जवळचे आहेत. ते प्रभावशाली नेते आहेत. त्यांना याबाबतची कल्पना गेल्या १५ दिवसात का असू नये आणि नसेल तर आम्ही तुम्हाला या व्हिडीओद्वारे फसवणुकीची कल्पना देत आहोत.

या हॉटेल व्यवस्थापनालाही याबद्दल टेन्शन आलं आहे. पण याची दखल रवींद्र फाटक यांनी घेतली पाहिजे. त्यांनी त्यांचा संपर्क वापरुन आमचे पैसे कसे परत मिळतील हे त्यांनी पाहिलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आमच्याबरोबर अनेकांची रक्कम अशाप्रकारे गेलेली आहे. त्यामुळे रवींद्र फाटक यांनी दखल घ्यावी. तसेच प्रशासकीय विभाग, पोलिस, सायबर क्राईम यांनी याप्रकरणाची दखल घेऊन आम्हाला आमचे पैसे कसे परत मिळतील, याकडे लक्ष द्यावे, अशी मी तुम्हाला विनंती करतो”, असे त्यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.

आणखी वाचा : “आधी धमकावले, नंतर अंधारात गाडी उभी केली आणि…” उबरमध्ये अभिनेत्री मनवा नाईकबरोबर घडला धक्कादायक प्रसंग

दरम्यान अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर हिने सध्या कार्यक्रमातून ब्रेक घेतला आहे. ती आणि तिचे पती दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांनी दिवाळीच्या सुट्टीत फिरण्यासाठी गणपतीपुळे या ठिकाणी गेले होते. त्यावेळी हा सर्व प्रकार घडल्याचे बोललं जात आहे. मात्र याप्रकरणी शिवसेना नेते रवींद्र फाटक यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kute kay karte fame marathi actress madhurani prabhulkar husband pramod prabhulkar talk about sequence of the hotel cheating case video viral nrp