Aamir Khan on Bollywood Celebrity : बॉलीवूडमधील कलाकार त्यांच्या लाइफस्टाइलमुळे कायमच चर्चेत असतात. त्यांची लाइफस्टाइल नेहमीच आकर्षणाचा आणि कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. पण, याच बॉलीवूड कलाकारांबद्दल आता आमिर खान बोलला आहे आणि त्यांची पोलखोल केली आहे. काही कलाकार त्यांच्या कामगारांचा खर्च निर्मात्यांना करायला लावत असल्याचं आमिरने म्हटलं आहे.

कोमल नाहटा यांच्याशी संवाद साधताना आमिर खान म्हणाला, “कलाकारांना ओळख मिळाली पाहिजे, पण एवढीही नाही की ते निर्मात्यांसाठी डोकेदुखी ठरतील. एकेकाळी कलाकारांचे ड्रायव्हर आणि त्यांच्या इतर कामगारांचा खर्च निर्मात्यांना उचलावा लागत होता, अशी सिस्टीम होती. मला हे खूपच विचित्र वाटलं होतं. मला असं वाटायचं की ड्रायव्हर आणि कामगार माझ्यासाठी काम करायचे तर त्यांचा खर्च निर्मात्याने का उचलावा? जर निर्माता माझे वैयक्तिक खर्च उचलत असेल तर माझ्या मुलांची फीदेखील त्यानेच भरावी का? कलाकारांचा सिनेमाशी निगडीत असलेला खर्च निर्मात्याने उचलला पाहिजे.”

आमिर खान पुढे म्हणाला, “मी असं ऐकलंय की आजकाल कलाकार त्यांच्या ड्रायव्हरचे पैसेही देण्याची तसदी घेत नाहीत, ते निर्मात्यांना त्याला पैसे द्यायला सांगतात. एवढंच नाही तर कलाकारांच्या स्पॉट बॉयचा खर्चही निर्माता उचलतो. सेटवरही कलाकारांचे वेगळे किचन असते. त्याचेही पैसे निर्मात्याने भरावे अशी त्यांची अपेक्षा असते. किचन, जीम या गोष्टींसाठी ते व्हॅनिटी व्हॅनचीही मागणी करतात.”

आमिर खान म्हणाला, “कलाकार कोटी रुपये कमावतात. तरीदेखील आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत का? मला हे खूप विचित्र वाटतं. हा सगळा खर्च निर्मात्यांवर टाकल्याने इंडस्ट्रीचं नुकसान होत आहे. ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी लागणाऱ्या ट्रेनिंगचा खर्च या गोष्टी ठीक आहेत, पण याव्यतिरिक्त तुमच्या वैयक्तिक सोयी सुविधांचं निर्मात्यावर ओझं लादू नये. असंच चालू राहिलं तर कलाकार निर्मात्यांकडून त्यांच्या फ्लॅटचे हप्ते भरण्याचीही अपेक्षा करू लागतील. जेव्हा तुम्हाला मेकअपसाठी फक्त एक व्हॅन हवी असते तेव्हा निर्मात्याने तुम्हाला सहा व्हॅन का द्याव्यात?”