Aamir Khan Touches Rajinikanth Feet : अभिनेते रजनीकांत यांचा आगामी चित्रपट ‘कुली’चा ट्रेलर नुकताच चेन्नईमध्ये मोठ्या कार्यक्रमात लाँच करण्यात आला. या कार्यक्रमात बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खान विशेष पाहुणा म्हणून हजर होता.
या वेळी दोघांमध्ये घडलेला एक छोटासा क्षण सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. ‘कुली’ चित्रपटात आमिर खानही छोट्याशा भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात आमिरचा जो लूक आहे, त्याच लूकमध्ये तो ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित होता. तेव्हा आमिरने केलेल्या कृतीकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.
‘कुली’ या चित्रपटात आमिर खान एक छोटीशी भूमिका साकारत आहे; तर या गँगस्टर ड्रामामध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे, ज्यांच्याबरोबर आमिर आणखी एक मोठा चित्रपटही करणार आहे. त्या निमित्ताने आमिरचा रजनीकांत यांच्याबद्दलचा आदर स्पष्टपणे दिसून आला. या कार्यक्रमाचा व्हिडीओ आता वेगाने व्हायरल होत आहे.
स्टेजवर रजनीकांत यांना भेटताच आमिर खानने वाकून रजनीकांत यांच्या पायाला स्पर्श करीत, त्यांना नमस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रजनीकांत यांनी आमिरला थांबवत उभे केले आणि त्याला प्रेमाने मिठी मारली. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आमिर आणि रजनीकांत यांच्यामध्ये परस्परांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे, हे दर्शवले.
झूमला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, आमिर खानने सांगितले की जेव्हा लोकेश कनगराजने त्याला ‘कुली’मध्ये कॅमिओ करण्याची ऑफर दिली तेव्हा त्याने पटकथेचा एकही शब्द न ऐकता, लगेच होकार दिला. तो म्हणाला, “हा रजनीसरांचा चित्रपट आहे, मी त्यात काहीही करण्यास तयार आहे.” पापाराझी पेज ‘ताहिर जासूस’ने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
‘कुली’ची स्टारकास्ट
‘कुली’मध्ये रजनीकांत आणि आमिरशिवाय नागार्जुन, सत्यराज, उपेंद्र, श्रुती हासन व सौबिन शाहीर हे कलाकारही दिसणार आहेत. हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी तमीळ, हिंदी, तेलुगु व कन्नड या भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.