ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चनला नुकतच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता अभिषेकने एक पोस्ट शेअर करत त्याच्या प्रकृतीची माहिती देत चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसचं नेमकं काय घडलं होतं ज्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं याचा खुलासा देखील अभिषेकने या पोस्टमध्ये केलाय.
अभिषेक बच्चनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. यात अभिषेक मास्क घालून एका खुर्चीवर बसल्याचं दिसतंय. त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर बेल्ट आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, “मागच्या बुधवारी चैन्नईमध्ये माझ्या आगामी सिनेमाचं शूटिंग सुरु असताना एक विचित्र दुर्घटना घडली. माझ्या उडव्या हाताला फ्रॅक्चर झालं. यासाठी सर्जरी करणं गरजेचं होतं. त्यामुळे मी लगेचच मुंबईला आलो. सर्जरी झाली आहे. सर्व काही पॅच अप आणि कास्टही झालंय.” असं म्हणत अभिषेकने त्याची प्रकृती ठिक असल्याचं सांगितलंय.
एवढचं नव्हे तर सर्जरीनंतर आठवडा झाला नाही तर अभिषेक पुन्हा कामासाठी सज्ज झालाय. पोस्टमध्ये तो म्हणाला, “पुन्हा चैन्नईला जाण्यासाठी तयार आहे. जसं की म्हणतात शो मस्ट गो ऑन… आणि जसं माझ्या वडिलांनी म्हंटलंय, मर्द तो दर्द नही होता. ठिक आहे… ठिक आहे थोडं दुखलं” असं मिश्किल अंदाजात म्हणत अभिषेकने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.
अभिषेक बच्चनला सर्जरीसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन तसचं श्वेता बच्चनसह ऐश्वर्याला देखील रुग्णालयाबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. मात्र अभिषेकला नेमकं काय झालंय हे न कळाल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आता अभिषेकच्या पोस्टने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.