बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंहचा केदारनाथ हा चित्रपट सुपरहिट ठरला. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाला तीन वर्षे पूर्ण झाली. हा चित्रपट ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता. सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात सुशांत आणि साराची जोडी प्रेक्षकांना फार आवडली होती. याच चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच चित्रपट निर्माते अभिषेक कपूरने सुशांतसोबतचे त्याचे नाते आणि बदलणाऱ्या समाजाबद्दल भाष्य केले होते.
चित्रपट निर्माते अभिषेक कपूर यांनी नुकतंच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, “सुशांत सिंहच्या ‘केदारनाथ’ चित्रपटासाठी कोणालाही एकही रुपया गुंतवायचा नव्हता. कारण अनेकांना वाटत होते की सुशांत स्टार नाही. यात काही विचित्र नाही. सुशांत हा स्टार नाही असे म्हणत लोक केदारनाथ चित्रपट सोडत होते.”
“पण मी मात्र या चित्रपटासाठी लढत होतो. हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी मी माझे स्वत:चे पैसे खर्च केले. त्यावेळी माझ्यावर फार दबाव होता. पण माझा संपूर्ण विश्वास असल्याने मला तो चित्रपट पूर्ण करायचा होता,” असेही अभिषेक यांनी सांगितले.
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याला जगभरातून भरपूर प्रेम मिळाले याबाबत अभिषेक कपूर यांना विचारले असता ते म्हणाले, “केदारनाथ चित्रपटाच्या निर्मितीवेळी सुशांत हा प्रचंड तणावाखाली होता. त्याला वेदना होत होत्या. पण तो या जगातून निघून गेल्यानंतर अचानक अनेकजण त्याचे चाहते झाले. त्यामुळे क्षणभर मला एखादा स्फोट झाल्यासारखे वाटले. ही आपली शोकांतिका आहे. खरं तर, आपल्या आजूबाजूला अशा एका व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे, ज्यात लोक त्याच्यावर किती प्रेम करतात, यावर ते विश्वास ठेवू देत नाही.”
‘केदारनाथ’ या चित्रपटाला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिषेक कपूर यांनी इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. त्यावेळी त्यांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली. नुकतंच अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘चंदीगढ करे आशिकी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यात आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर दिसत आहेत.