दार उघड बये म्हणत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाद्वारे घराघरात ‘भावोजी’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या आदेश बांदेकर यांचा आज वाढदिवस. आदेश बांदेकर हे अभिनेते-सुत्रसंचालक म्हणून कायमच चर्चेत असतात. महाराष्ट्रातील सगळ्यांचे लाडके भावोजी म्हणून ते घराघरात लोकप्रिय आहेत. आदेश बांदेकर हे सिनेसृष्टीसह राजकारणातही सक्रीय आहेत. पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आणि लालबागचा राजा याचे एक कनेक्शन आहे. आदेश बांदेकरांनी याबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदेश बांदेकर हे एकेकाळी गणेशोत्सवात गिरणगावात नारळ विक्रीचे काम करायचे. त्याबरोबर त्यांनी वर्गणी काढण्यापासून, मिरवणुकीत नाचण्यापर्यंत अनेक गोष्टींचा अनुभव घेतला आहे. आदेश बांदेकर आज गिरणगावातल्या गणेशोत्सवात सन्मानमूर्ती म्हणून सहभागी होतात. मात्र काही वर्षांपूर्वी ‘सकाळ’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गणेशोत्सव आणि राजकीय कारकीर्द कशी सुरु झाली? याबद्दल सांगितले होते.

आदेश बांदेकर काय म्हणाले?

“मी आज जे काही आहे ते केवळ गणपतीचे आशीर्वाद आहेत म्हणून आहे. तो आपलं आराध्य दैवत असला तरी त्याचं आणि माझं खास नातं आहे. त्याचे संकेत त्याने वेळोवेळी दिले आहेत. एवढंच नाही तर माझ्या आयुष्यातील सूर, ताल, लय जे काही आहे, ते केवळ या गणेशोत्सवामुळेच आहे. माझं बालपण काळचौकीतील अभ्युदय नगर या ठिकाणी गेले. अभ्युदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाशी माझं वेगळं नातं आहे. ४३ इमारतींचा मिळून बसणारा हा बाप्पा म्हणजे आम्हाला आमच्या कुटुंबाचा वाटायचा. या मंडळाप्रमाणेच ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ हे देखील मला तितकेच जवळचे होते.

लहानपणी लालबागच्या मच्छी मार्केट मधून मासे आणताना बाजूलाच एका पत्रे लावलेल्या खणात काहीतरी घडत असायचं, ते पत्रे जितके शक्य तितके वाकवून आम्ही आत डोकावायचो आणि आतमध्ये गणपतीची मूर्ती कशी आकार घेते हे पाहायचो. त्यावेळी कुणीतरी आम्हाला हुसकावून लावायचं आणि जेव्हा तो पत्रा बाजूला व्हायचा तेव्हा लालबागच्या राजाचं दर्शन घडायचं. मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी अनंत चतुर्दशीला मात्र मी अभ्युदय नगरच्या राजाच्या मिरवणुकीत, लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत नाचताना किंवा ढोल वाजवताना दिसणारच हा कित्येक वर्षांचा ठरलेला कार्यक्रम आहे.

कारण याच गणेशोत्सवाने मला ताल, सूर, लय यांचं शिक्षण दिलं आहे. विशेष म्हणजे तेही कोणतीही फी न आकारता. आजही गणेशोत्सवात अंगावर गुलाल मिरवणं म्हणजे मला मी जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे, असं वाटतं. त्या गुलालाच्या रंगात मी इतका रंगून गेलोय की गणेशोत्सव मंडळ ते सिद्धिविनायक मंदिराचा अध्यक्ष इतका मोठा प्रवास कधी पार केला कळलच नाही. गणेशोत्सव आपल्याला बरंच काही शिकवतो. आयुष्यात काय करायचं आणि काय नाही, हे शिकवणारा मुंबईचा गणेशोत्सव आहे. लग्नानंतर अनंत चतुर्दशीला मला दूरदर्शनच काम मिळालं तसंच अनेक संधी याच उत्सवात माझ्याकडे चालून आल्या. हा त्याचाच प्रसाद आहे, असे मी मानतो.

एकदा लालबागच्या राजाची मिरवणूक दोन टाकीला वळत होती. मी नेहमीप्रमाणे त्या मिरवणुकीत सहभागी झालो होतो. त्यावेळी त्यांनी सत्कारासाठी स्टेजवर बोलावलं. मी स्टेजवर आणि समोर लालबागचा राजा होता. त्याचवेळी माझा फोन वाजला. तो फोन शिवसेनेतून होता. त्या दिवशी मी शिवसेनेत प्रवेश केला आणि माझा राजकीय प्रवास सुरू झाला.

विशेष म्हणजे मी पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर पडलो. त्यानंतर मला उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आला. ते म्हणाले, आदेश तुम्हाला सिद्धीविनायकाची जबाबदारी घ्यायची आहे. त्या दिवशी मी सिद्धीविनायक मंदिर न्यासाचा अध्यक्ष झालो. माझ्या राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील कारकिर्दीमागे त्याचे आशीर्वाद आहेत. मी जे प्रामाणिकपणे काम करतोय ही त्याचीच शिकवण आहे”, असे आदेश बांदेकरांनी यावेळी म्हटले.

दरम्यान आदेश बांदेकर यांनी सप्टेंबर २००९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी २००९ मध्ये माहिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली त्यांचे काम सुरू ठेवले. त्यानंतर जुलै २०१७ मध्ये आदेश बांदेकर यांची श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देखील देण्यात आला होता. त्यानंतर जुलै २०२० पासून पुढील तीन वर्षांसाठी आदेश बांदेकर यांची श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor aadesh bandekar enter into shivsena party has a special connection with lalbaugcha raja nrp