Kajol Horror Experience : बॉलीवूड अभिनेत्री काजोल ही इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलीवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या आगामी ‘माँ’ चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. ती तिच्या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन करत आहे.

अलीकडेच काजोल प्रमोशनसाठी हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये आली होती. अभिनेत्रीने फिल्म सिटीबद्दल एक धक्कादायक गोष्ट उघड केली आणि म्हणाली की, या ठिकाणी शूटिंग करताना तिला नेहमीच अस्वस्थ वाटतं.

“रामोजी फिल्म सिटीमध्ये ‘भूतिया वाईब्स’ आहेत” : काजोल

काजोलने असाही दावा केला की, रामोजी फिल्म सिटीमध्ये ‘भूतिया वाईब्स’ आहेत आणि ती म्हणाली की तिला हे ठिकाण सोडून जायचे आहे आणि कधीही परत यायचे नाही. ओडिशा टीव्हीच्या वृत्तानुसार काजोलने ‘माँ’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना हे उघड केले.

मुलाखतीमध्ये काजोल म्हणाली, “आम्हाला शूटिंगवेळी रात्री कुठे झोपायचे हे देखील माहीत नसते. आम्ही एखाद्या ठिकाणी शूट केलं तरी त्या ठिकाणी आम्हाला परत जावेसे वाटत नाही. अशी अनेक ठिकाणे आहेत. आपल्याकडे याची उत्तम उदाहरणे आहेत, हैदराबादमधील रामोजी राव स्टुडिओ, जे जगातील सर्वात भुताटकीच्या ठिकाणांपैकी एक मानले जाते आणि म्हणून मला वाटले की देवाने मला वाचवलं आणि मी काहीही पाहिले नाही. मला या ठिकाणी शूटिंग करताना नेहमीच अस्वस्थ वाटायचं.”

काजोलने रामोजी फिल्म सिटीमध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण केले आहे. ही फिल्म सिटी भारतातील सर्वात महत्त्वाच्या चित्रपट निर्मिती ठिकाणांपैकी एक आहे आणि बॉलीवूड, टॉलीवूड आणि अनेक भाषांमधील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे.

याशिवाय, काजोलचा पती आणि अभिनेता अजय देवगणदेखील याच ठिकाणी अनेक चित्रपटांवर काम करत आहे आणि अलीकडेच तो तेलुगू ब्लॉकबस्टर ‘आरआरआर’ मध्ये दिसला होता.

दरम्यान, काजोल तिच्या आगामी ‘माँ’ चित्रपटात आईची भूमिका साकारत आहे, जी तिच्या मुलाचे रक्षण करण्यासाठी कोणाशीही लढण्यास तयार असते. या चित्रपटात अजय देवगण, ज्योती देशपांडे आणि कुमार मंगत पाठक यांच्याही भूमिका आहेत आणि जिओ स्टुडिओज आणि देवगण फिल्म्स निर्मित आहेत.