Neha Sharma Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-जदयुच्या आघाडीने २४३ पैकी २०२ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. यामुळे राजद-काँग्रेस आघाडीची दाणादाण उडाली. सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या महाआघाडीला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले. बिहारमध्ये अनेक मतदारसंघात अटीतटीच्या लढती झाल्या. भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव पासून अवघ्या २५ वर्षांची गायिका मैथिली ठाकूर असे अनेक चर्चेतील चेहरे निवडणुकीत उतरले होते. यात भागलपूरच्या काँग्रेस उमेदवारांचीही चर्चा होती.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा शर्माचे वडील राजकारणी आहेत. माजी आमदार असलेले सतीश शर्मा अनेक वर्षांपासून काँग्रेसमधून निवडणुका लढवत आहेत. यंदा विधानसभेच्या प्रचारासाठी अभिनेत्री नेहा शर्माही भागलपूरमध्ये पोहोचली होती. त्यामुळे या मतदारसंघाच्या प्रचाराची चर्चा राज्यभर झाली. वडिलांसाठी जोरदार प्रचार करूनही नेहा शर्माच्या वडिलांचा विजय होऊ शकलेला नाही.
मुलीच्या ग्लॅमरचा लाभ मिळाला नाही
नेहा शर्मा अनेक वर्षांपासून वडिलांसाठी निवडणुकीच्या वेळेस प्रचार करत आहे. मात्र २०२४ ची लोकसभा आणि आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत नेहाचे वडील सतीश शर्मा यांना विजय मिळू शकला नाही. मुलीच्या ग्लॅमरचा वडिलांना यावेळी फायदा होऊ शकलेला नाही. काँग्रेसच्या तिकीटावर लढणाऱ्या अजित शर्मांचा भाजपाच्या रोहित पांडे यांनी पराभव केला आहे. रोहित पांडे यांना तब्बल १ लाख ७७० मते मिळाली. तर अजित शर्मा यांना ८७ हजार २९६ एवढी मते मिळाली.
लोकसभेला जेडीयूचे उमेदवार अजय मंडल यांनी अजित शर्मा यांचा पराभव केला होता. अजित शर्मा यांना २ लाख १३ हजार ३८३ मतं मिळाली. तर जेडीयूचे अजय मंडल यांना २ लाख ७९ हजार ३२३ मतं मिळाली.
कोण आहे नेहा शर्मा?
नेहा शर्माने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात काम केलेले आहे. २०१० साली आलेल्या क्रुक चित्रपटातून नेहाने कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तानाजी, क्या सुपर कुल है हम, जयंतभाई की लव्ह स्टोरी, यंगीस्तान, तुम बिन २, बॅड न्यूज अशा अनेक चित्रपटात तिने काम केले आहे. तसेच हॉटस्टारवरील इललिगल या वेबसीरीजमध्येही ती प्रमुख भूमिकेत होती.
नेहा शर्माचे इन्स्टाग्रामवर दोन कोटी फॉलोअर्स आहेत. तिच्या सोशल मीडियावर ती उंची जीवनशैली जगतानाचे अनेक फोटो पोस्ट करत असते. मोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती, विदेश दौरे आणि चित्रपट, मालिकांच्या प्रमोशनच्या फोटोंनी तिचा सोशल मीडिया व्यापलेला आहे. मात्र निवडणूक आली की, नेहा शर्मा भागलपूरच्या रस्त्यांवर दिसते. मतदारसंघातील लोकांनाही हे चित्र आता परिचयाचे झाले आहे.
तीन वेळा भागलपूरचे आमदार
२०२० च्या विधानसभा निवडणकुीत अजित शर्मा यांचा निसटता विजय झाला होता. त्यांना ६५,५०२ मते मिळाली होती. तर भाजपाच्या रोहित पांडे यांना ६४,३८९ मते मिळाली होती. अवघ्या १,११३ मतांनी पांडे पराभूत झाले होते. या निवडणुकीत चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष (रामविलास) स्वबळावर निवडणूक लढवत होता, त्यामुळे मत विभाजन होऊन त्याचा लाभ शर्मा यांना मिळाला होता. यंदा लोजप एनडीएत असल्यामुळे त्याचा फायदा भाजपा आणि जदयूला मिळाला असल्याचे दिसले.
अजित शर्मा यांनी २०१४ ची पोटनिवडणूक आणि त्यानंतर २०१५ व २०२० च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून तीन वेळा आमदार होण्याचा मान मिळवला होता. मात्र यावेळी भाजपाने पुन्हा एकदा भागलपूर मतदारसंघ शर्माच्या याच्या ताब्यातून हिसकावला आहे.
