Aishwarya Rai Injured Her Head in Hot Air Balloon Bobby Deol Recalls : राहुल रवैल यांच्या ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून ऐश्वर्या राय बच्चनने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, ज्यामध्ये तिने बॉबी देओलबरोबर काम केले होते. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत बॉबीने स्वित्झर्लंडमध्ये ऐश्वर्याबरोबर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक घटना घडलेली याबद्दल सांगितले आहे.

चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या कशी घाबरली होती याबद्दल बोलताना बॉबीने रेडिओ नशाला सांगितले, “ऐश्वर्या आपल्या देशातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, पण हा तिचा पहिलाच चित्रपट होता, त्यामुळे ती थोडी घाबरली होती; पण ती एक चांगली डान्सरदेखील आहे.”

चित्रपटाच्या चित्रीकरणाबद्दल माहिती देताना बॉबी म्हणाला, “आम्ही स्वित्झर्लंडमध्ये ४० दिवस होतो. मी तिथे खूप बोअर झालो होतो. संपूर्ण युनिट सकाळी ७ वाजता बसमध्ये चढत असे आणि राहुल (रावैल) जिथे बस थांबवत तिथे आम्ही शूट करत असे. त्यावेळी आमच्याकडे बसण्यासाठी खुर्च्या नव्हत्या, पण सुदैवाने सगळीकडे गवत होते, त्यामुळे आम्ही जमिनीवर बसत असू. पण, ते रोमांचक आणि मजेदार होते.”

चित्रपटातील एका सीनच्या चित्रीकरणादरम्यान ऐश्वर्याला कशी दुखापत झाली होती याची आठवण करून देताना बॉबी म्हणाला, “आम्ही हॉट एअर बलूनमधेही शूट केले होते. पण, लँडिंगमध्ये गोंधळ झाला आणि ऐश्वर्याच्या डोक्याला दुखापत झाली. मी कसा तरी बचावलो. मी या घटनेबद्दल कधीही बोललो नाही, पण सुदैवाने ती बरी होती.” ‘और प्यार हो गया’ हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या फ्लॉप ठरला, तरीही ऐश्वर्या राय भारतीय चित्रपटसृष्टीत सुपरस्टार बनली.

बॉबी देओल बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मुळे चर्चेत आहे. यामध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकत आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. बॉबी देओलने आजवर अनेक चित्रपटांत काम केलं आहे. तसेच बॉबी एम एक्स प्लेअर’वरील ‘आश्रम’ या सीरिजमुळे बराच चर्चेत होता. यानंतर तो रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात झळकला.

‘हमराज’, ‘दोस्ती’, ‘चोर मचाये शोर’, ‘पोस्टर बॉईज’, ‘यमला पगला दिवाना फिर से’, ‘रेस ३’ अशा अनेक चित्रपटांतून बॉबी देओलने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचे काही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अभिनेत्याने चित्रपटांपासून अंतर ठेवल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, २०२३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील त्याच्या लूक व भूमिकेने अभिनेता पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला.