बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणने त्याच्या आतापर्यंतच्या ३० वर्षाच्या करिअमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. सिल्वर स्कीननंतर आता तो लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे. ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजच्या माध्यमातून तो ओटीटीवर डेब्यू करणारेय. हा एक क्राईम ड्रामा आहे.
कोरोनाकाळात अनेक बड्या कलाकारांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दिली आहे. अमिताभपासून अभिषेक बच्चनपर्यंत अनेक कलाकारांनी आपले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले आहेत. आता अजय देवगण ही या दिशेन आपले पाऊल टाकत आहे. नुकतंच अजय देवगण याने त्याच्या आगामी ‘रूद्र’ या वेब सीरिजबाबत माध्यमांशी संवाद साधला. डिज्नी + हॉटस्टार द्वारा आयोजित एका व्हर्चुअल प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना अजय देवगण म्हणाला, “रुद्र ही खूपच सुंदर लिहिलेला आणि रियलिस्टिक शो आहे. यातील माझं कॅरेक्टर ग्रे आहे. कोणीच एका चांगल्या व्यक्तीला पाहणं पसंत करत नाहीत…पण कॉन्ट्रोवर्सी या चालत राहतात.”
आपल्या आगामी वेब सीरिज ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’ बद्दल बोलताना अभिनेता अजय देवगण म्हणाला, “रूद्र या सीरिजची कहाणी एका ब्रिटीश शोमधून घेतली आहे. या कहाणीच्या मुळाशी जाऊन यावर काम करण्यात आलंय. यामुळेच मी या प्रोजेक्टकडे जास्त आकर्षित झालो. याची स्क्रिप्ट मिळण्याआधीच मी या सीरिजचा ओरिजनल शो पाहिला होता. यातलं स्केल आणि डिझाइन हे जसंच्या तसं ठेवण्यात आलंय. यासाठी कोणती जबरदस्ती केली नव्हती. पण न ठेवण्यासाठी सुद्धा काही कारण नव्हतं.”
यापुढे आपल्या ओटीटी डेब्यूवर बोलताना अभिनेता अजय देवगण म्हणाला, “आजच्या काळात ओटीटीच्या माध्यमातून मनोरंजनाचा जो विस्तार होतोय, याचा दर्जा सुद्धा वाखाणण्याजोगा आहे. तसंच फिल्म निर्मात्यांना सुद्धा त्यांचे वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक पहिल्या गोष्टींपेक्षा माझी ही पहिली सीरिज माझ्यासाठी खूप मोठी आहे. एक अभिनेता या नात्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मी वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि स्वतःला सिद्ध करण्यावर विश्वास ठेवला.”