akshay kumar provides life insurance 650 stunt workers : अलीकडेच एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रसिद्ध स्टंटमॅन एस. एम. राजू यांचे वेदनादायक निधन झाल्याने दक्षिण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. हे पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधीही सेटवर झालेल्या चुकीमुळे अनेक स्टंट कलाकारांचा मृत्यू झाला आहे.

चित्रपटांसाठी हे ‘खतरों के खिलाडी’ आहेत, जे चित्रपट पूर्ण करण्यात सर्वांत मोठी भूमिका बजावतात; परंतु कधीही प्रसिद्धीझोतात येत नाहीत. अलीकडेच स्टंटमॅन एस. एम. राजू यांचे ‘वेट्टावम’ या तमीळ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान निधन झाले.

अभिनेता आर्या आणि दिग्दर्शक पा. रणजित यांच्या चित्रपटाच्या सेटवर ही दुर्घटना घडली. आता या वेदनादायक घटनेनंतर बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारने एक मोठे पाऊल उचलले आहे.

चित्रपट उद्योगातील स्टंट कलाकारांच्या सुरक्षेबाबत अक्षय कुमारने एक प्रशंसनीय पाऊल उचलले आहे. सेटवर स्टंटमॅन एस. एम. राजू यांचा दुःखद मृत्यू झाल्यानंतर अक्षयने सुमारे ६५० स्टंटमन आणि स्टंटवूमन यांच्या विमा संरक्षणाची जबाबबदारी पार पाडली आहे.

अक्षय कुमारचे कौतुकास्पद पाऊल

या घटनेनंतर अक्षय कुमारने भारतीय स्टंट कलाकारांसाठी विमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ६५० ते ७०० स्टंट कलाकारांना संरक्षित केले गेले आहे. ‘गुंजन सक्सेना’, ‘अँटीम’, ‘ओएमजी २’ आणि आगामी ‘धडक २’ व ‘जिगरा’ चित्रपटांमध्ये काम केलेले ज्येष्ठ स्टंट दिग्दर्शक विक्रम सिंह दहिया यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले, “अक्षयसरांचे आभार! आता बॉलीवूडमधील सुमारे ६५० ते ७०० स्टंटमन आणि अ‍ॅक्शन क्रू सदस्यांना विम्याअंतर्गत संरक्षण मिळाले आहे. या विमा योजनेमध्ये ५ ते ५.५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय उपचारांचा समावेश आहे; मग ती दुखापत सेटवर झालेली असो किंवा सेटबाहेर.”

बॉलीवूड आणि दक्षिण चित्रपटांमधील स्टंट कलाकार आपला जीव धोक्यात घालून काम करतात; परंतु त्यांना अनेकदा सुरक्षा आणि विमा यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. एस. एम. राजूच्या मृत्यूने हे वेदनादायक सत्य समोर आणले आहे. अक्षयचे पाऊल केवळ एक जबाबदार स्टार कलाकार म्हणूनच कौतुकास्पद नाही, तर त्या चित्रपट उद्योगात सुरक्षिततेचे नवीन मानकदेखील स्थापित करू शकते. लोक सोशल मीडियावर अक्षय कुमारचे कौतुक करीत आहेत.

कशी घडली दुर्घटना?

‘वेट्टुवम’ या तमीळ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान १३ जुलै रोजी एका दुःखद अपघातात ज्येष्ठ स्टंटमन एस. एम. राजू यांचा मृत्यू झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन पा. रणजित यांनी केले आहे आणि त्यात अभिनेता आर्या मुख्य भूमिकेत आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावरही समोर आला आहे, ज्यामध्ये राजू कार उलटण्याचा स्टंट करताना त्यांच्या गाडीचे रॅम्पवरील नियंत्रण सुटले आणि गाडी अनेकदा उलटी होऊन जमिनीवर आदळली. सिनेमाचे पथक तातडीने गाडीजवळ पोहोचले; परंतु घटनास्थळी उपस्थित असलेल्या क्रूला काहीही समजेपर्यंत खूप उशीर झाला होता आणि गंभीर जखमी राजू यांचा जागीच मृत्यू झाला.