अभिनेता अक्षय कुमार हा इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याला आता बॉलीवूडमध्ये ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अक्षयसाठी बॉलीवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणे सोपे नव्हते. त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. आता अलीकडेच एका मुलाखतीत, अभिनेत्याने त्याचे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याला कशी वागणूक देण्यात आलेली आणि त्याने या सर्व गोष्टी कशा हाताळल्या हे सांगितले आहे.

एबीपी न्यूजशी बोलताना अक्षय कुमार म्हणाला, “मी माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मी सलग फ्लॉप चित्रपट दिले आहेत, कधीकधी सलग १५-१६ तर कधी सलग हिट चित्रपट दिले आहेत. आयुष्यात ही एक सामान्य गोष्ट आहे. मी आतापर्यंत सुमारे १५० चित्रपटांमध्ये काम केले आहे.”

अक्षय पुढे म्हणाला, “जेव्हा माझे चित्रपट शुक्रवार, शनिवार व रविवारी चांगले काम करीत नाहीत तेव्हा मी निराश होतो; पण सोमवारी मी नव्याने सुरुवात करतो. मी माझ्या पुढच्या चित्रपटाची तयारी सुरू करतो. तुम्ही ते सावधगिरीने घेतले पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. फ्लॉप चित्रपट फक्त एकदाच नाही, पण तीन वेळा झाले. कधी कधी सलग १५ चित्रपट, कधी कधी १४, पण तो सर्व आयुष्याचा भाग आहे.”

अक्षय म्हणाला, “तुम्ही एका चित्रपटासाठी ८० दिवस घालवता, नंतर तो डब करता, नंतर त्याचे प्रमोशन करता आणि जेव्हा तो प्रेक्षकांना प्रभावित करू शकत नाही तेव्हा ते खूप दुःखद असते. मला एकटे बसून कोणाशीही बोलू वाटत नाही. माझी पत्नी हे समजते म्हणून ती मला पाठिंबा देते आणि माझ्या मुलांना सांगते की, बाबांना एकटे सोडा; ते काही दिवसांत बरे होतील.”

अक्षय कुमारने या काळात चित्रपटसृष्टीत कलाकारांबरोबर कसे वागले जाते याबद्दलही सांगितले. अभिनेता म्हणाला, “तुमच्या मागील चित्रपटाच्या कामगिरीनुसार तुमच्या खोल्यांचा आकार बदलत राहतो. जेव्हा तुमचा चित्रपट चांगला चालतो तेव्हा तुम्हाला कधी कधी प्रेसिडेंशियल सूट, कधी कधी व्हाईस-प्रेसिडेंशियल सूट आणि कधी कधी सामान्य खोली मिळते. आता माझ्याबरोबर असे घडत नाही; परंतु मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ते अनुभवले आहे.”

अक्षय पुढे म्हणाला, “एकदा मी दोन नायकांसह एक चित्रपट करीत होतो. मी दुसऱ्या अभिनेत्याचे नाव घेणार नाही; पण त्याचा मागील चित्रपट हिट झाल्यामुळे त्याला मोठी खोली मिळाली, तर मला एक छोटी खोली देण्यात आली. मला अजूनही आठवते की, मी त्याच्या खोलीत गेलो होतो आणि विचार करीत होतो की, माझी खोली तितकी मोठी का नाही; पण नंतर मला कळले की, माझे चित्रपट चांगले चालले नव्हते म्हणून असे झाले.”

अक्षय म्हणाला की, या गोष्टींना सावधगिरीने घेतले पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. काही निर्मात्यांनी असे केले; पण सर्वांनी नाही. मी कधीही याबद्दल तक्रार केली नाही. मी अशा ठिकाणाहून आलो आहे, जिथे एका खोलीत २४ लोक राहत होते.