Akshay Kumar On Cyber Crime : अभिनेता अक्षय कुमारने सायबर गुन्ह्यांबाबत एक मोठा खुलासा केला आहे. त्याने त्याची मुलगी नितारा व्हिडीओ गेम खेळताना सायबर गुन्ह्याचा बळी होण्यापासून थोडक्यात कशी बचावली हे सांगितले. अक्षयची मुलगी नितारा ही फक्त १३ वर्षांची आहे.

नुकत्याच झालेल्या एका सायबर अवेअरनेस कार्यक्रमात अक्षय कुमारने एक धक्कादायक अनुभव सांगितला. अक्षय कुमारने खुलासा केला की, काही महिन्यांपूर्वी त्याची मुलगी नितारा व्हिडीओ गेम खेळत असताना एक घटना घडली.

अक्षय म्हणाला, “काही महिन्यांपूर्वी माझ्या घरी घडलेली एक छोटीशी घटना मी तुम्हाला सांगू इच्छितो. माझी मुलगी व्हिडीओ गेम खेळत होती. नितारा एका अनोळखी व्यक्तीबरोबर खेळत असताना, सुरुवातीला अगदी सामान्य मेसेज येत होते, जसे की ‘थँक्यू’, ‘वेल प्लेड’, ‘तू खूप छान खेळलीस.”

अक्षय पुढे म्हणाला, “गप्पा सुरू असताना त्या व्यक्तीने निताराला विचारले की ती कुठून आहे. तिने ‘मुंबई’ असे उत्तर दिले. ‘तू मेल आहेस की फिमेल?’ असे विचारल्यावर तिने ‘फिमेल’ असे सांगितले. इथपर्यंत सर्व ठीक होते. मात्र, यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने थेट मेसेज केला, “तू मला न्यूड फोटो पाठवशील का?” हा मेसेज वाचताच निताराने लगेच गेम बंद केला आणि हा संपूर्ण प्रकार त्वरित तिची आई ट्विंकल खन्नाला सांगितला. अक्षय म्हणाला की, तिने ही घटना लगेचच आईला सांगितली, ही खूप चांगली गोष्ट होती.”

नितारा ही १३ वर्षांची आहे, तिचा जन्म २५ सप्टेंबर २०१२ रोजी झाला होता. नितारा क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसते. पण जेव्हा जेव्हा ती दिसते, तेव्हा तिच्या गोंडसपणाने ती सर्वांचे मन जिंकते.

अक्षय कुमारने या घटनेवरून पालकांना सायबर क्राईमपासून सावध केले. तो म्हणाला, “याच पद्धतीने सगळं सुरू होतं. हासुद्धा सायबर क्राईमचाच एक भाग आहे. अशा प्रकारे लोक मुलांना जाळ्यात अडकवतात, नंतर पैसे उकळतात. यानंतर अनेक प्रकारच्या घटना घडतात, काही प्रकरणांमध्ये लोकांनी आत्महत्याही केली आहे.”