Amitabh Bachchan Give Most Romantic Scene With Smita Patli : अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेसृष्टीतलं मोठं नाव. ते गेल्या चार दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. अमिताभ बच्चन आज ११ ऑक्टोबर रोजी त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बींचे चाहते जगभरातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आजही आयकॉनिक मानली जाते. रेखाव्यतिरिक्त झीनत अमान आणि परवीन बाबी यांसारख्या बोल्ड अभिनेत्रींबरोबरही त्यांनी काम केले.
पण तुम्हाला माहीत आहे का, त्या काळात पडद्यावरचे सर्वात जास्त बोल्ड सीन त्यांनी दुसऱ्याच एका अभिनेत्रीबरोबर दिले होते? ही अभिनेत्री म्हणजे बॉलीवूडमधील सर्वात हुशार आणि प्रतिभाशाली मानली जाणारी स्मिता पाटील. ‘शक्ती’ या चित्रपटाच्या ‘जाने कैसे कब कहाँ’ या गाण्यात अमिताभ यांनी केवळ रोमान्स केला नाही, तर त्या काळानुसार बोल्ड सीनदेखील दिले, ज्यामुळे हा चित्रपट खूप गाजला. हे गाणे आजही खूप ऐकले जाते आणि यूट्यूबवरही पाहिले जाते.
१९८२ मध्ये अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. स्मिता पाटील यांनी या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. ‘शक्ती’ हा चित्रपट फक्त रोमान्समुळेच नाही तर कथेमुळेही गाजला होता. अमिताभ बच्चन व्यतिरिक्त, या चित्रपटात दिलीप कुमार आणि राखी गुलजार यांनीही भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट एक निवृत्त पोलिस अधिकारी आणि त्याच्या मुलामधील संघर्षाची कहाणी सांगतो. दिलीप कुमार यांनी आयुक्ताची भूमिका साकारली होती आणि अमिताभ यांनी त्यांच्या मुलाची भूमिका केली होती.
‘शक्ती’ चित्रपटात एकूण चार गाणी होती, त्यातील ‘हमने सनम को खत लिखा’ आणि ‘जाने कैसे कब कहाँ’ ही गाणी तुफान हिट झाली होती. आजही ही गाणी ऐकली जातात. बॉलीवूड हंगामाच्या मते, त्यावेळी चित्रपटाने ८ कोटी रुपये कमावले होते.
अमिताभ बच्चन यांचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते फक्त त्यांच्या चित्रपटांमुळेच नव्हेत तर त्यांच्या सोशल मीडिया पोस्टनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चा १७ वा सीझन होस्ट करत आहेत.