Rekha Stopped Eating Non Veg to Impress Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि रेखा ही चित्रपटसृष्टीतील दोन मोठी नावे आहेत. एक काळ असा होता की, त्यांचे नातेही चर्चेचा विषय होते. आजही सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल वेगवेगळे दावे केले जातात. आता एका वरिष्ठ पत्रकाराने त्यांच्या नात्याबद्दल सांगितले आहे.

एका अभिनेत्रीने त्यांना सांगितले होते की, रेखा यांनी अमिताभ बच्चन यांना खूश करण्यासाठी मांसाहारी जेवण सोडले होते. त्या सेटवर मांसाहारी जेवण खात नव्हत्या.

‘हिंदी रश’ला दिलेल्या एका खास मुलाखतीत, बऱ्याच काळापासून मनोरंजन क्षेत्राचे वार्तांकन करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी सांगितले की, त्या काळात रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याबद्दलच्या बातम्या कशा पसरत होत्या. पूजा यांना विचारण्यात आले की, जेव्हा रेखा ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नात भांगेत कुंकू लावून आल्या तेव्हा वातावरण कसे होते? या प्रश्नाच्या उत्तरात पूजा म्हणाल्या, जेव्हा रेखा भांगेत कुंकू लावून आल्या तेव्हा ते आश्चर्यकारक होते.

पुढे पूजा सामंत म्हणाल्या की, एका ज्येष्ठ अभिनेत्रीने त्यांना सांगितले होते की, रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी मांसाहार सोडला होता. कोणत्याही अभिनेत्रीचे नाव न घेता, त्यांनी सांगितले की, या अभिनेत्रीने दोघांबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि ती अभिनेत्री स्वतः म्हणत होती की, त्या काळात रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या बातम्यांमध्ये तथ्य होते.

पूजा म्हणाल्या की, अभिनेत्रीने त्यांना असेही सांगितले की, अमिताभ बच्चन शाकाहारी आहेत म्हणून रेखानेही शाकाहारी जेवण सुरू केले होते. अभिनेत्रीने पत्रकाराला सांगितले की, रेखा शूटवर मांसाहारी जेवण करीत नव्हत्या, जेणेकरून त्या अमिताभ बच्चन यांना प्रभावित करू शकतील. पूजा म्हणाल्या, “त्यांच्यात जवळीक वाढली होती, पण कालांतराने ते वेगळे झाले.”

दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली. १९८१ साली प्रदर्शित झालेला ‘सिलसिला’ हा सिनेमा बिग बी आणि रेखा यांचा शेवटचा सिनेमा ठरला. आज रेखा आणि अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्यात फार पुढे निघून गेले आहेत; पण रेखा आजही बिग बी यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना दिसतात.