बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. नेटकऱ्यांमध्ये नव्याची सतत चर्चा असते.. आजोबा बॉलिवूडचे शहेनशहा असले तरी नव्या मात्र बॉलीवूडच्या ग्लॅमरपासून दूरच आहे. नव्या नवेली नंदा तिच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळते. तसेच तिची स्वतःची देखील एक संस्था आहे. ही संस्था सामाजिक कार्य करते. नव्याचे बॉलिवूडमध्ये देखील अनेक मित्र मैत्रिणी आहेत. सुहाना खान, अनन्या पांडे हे स्टार किड्स नव्याच्या खास मैत्रिणी आहेत. सुहाना अनन्या सोबत पार्टी करतानाचे नव्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. असं असलं तरी नव्या नंदा मात्र बॉलिवूड पासून दूर राहणं पसंत करते.

नव्या नंदाने नुकताच एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. एका चाहत्याने तिच्या फोटोवर कमेंट करत तिला ‘सुंदर’ म्हटलंय. यावेळी या चाहत्याने तिला बॉलिवूडमध्ये जावं असा सल्ला दिला आहे . युजर म्हणाला “तू सुंदर आहेस, तू बॉलिवूडमध्येही प्रयत्न केला पाहिजे.” युजरच्या या कमेंटवर नव्या नंदाने त्याचे आभार मानत प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद. मात्र सुंदर महिला देखील बिझनेस करू शकतात.”

नव्याच्या फोटोवर तिला अनेक चाहत्यांनी पसंती दिली आहे. नव्या सोशल मीडिया वरून कायमच तिच्या वेगवेगळ्या उपक्रमांची देखील माहिती देत असते. तसेच अनेकदा मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते.

नव्या नवेली नंदाने गेल्या वर्षी न्यूयॉर्कच्या फोर्डहॅम विद्यापीठातून पदवी संपादन केली होती. त्यानंतर तिने सह-संस्थापक मल्लिका सहनीसमवेत आरा हेल्थ नावाचे एक ऑनलाइन हेल्थकेअर पोर्टल सुरू केले. आरा हेल्थ हा महिलांच्या आरोग्याविषयी जागरुकता वाढविणारा उपक्रम आहे. नव्याने नुकताच आरा वेलनेस नावाचा आणखी एक उपक्रम देखील सुरू केला.