अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत स्टारर एकता कपूरची ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका भारतीय टेलिव्हिजनमध्ये सगळ्यात जास्त पाहण्यात आलेली मालिका ठरलीय. या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. सात वर्षानंतर पुन्हा एकदा ही मालिका नव्या रूपात आणण्यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. ‘पवित्र रिश्ता २.०’ मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा अर्चना बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या मालिकेतील अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ठिकाणी मानव म्हणून अभिनेता शाहीर शेखच्या नावाची चर्चा सुरूय. यावर अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपली प्रतिक्रिया दिलीय.
एका माध्यमाने अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला शुक्रवारी तिच्या घरासमोर स्पॉट केलं. यावेळी अंकिता लोखंडे हिला तिच्या आगामी मालिकेबाबत प्रश्न केला. यावेळी अंकिता लोखंडेने ‘पवित्र रिश्ता २.०’ साठी उत्सुक असल्याचं सांगितलं. “या मालिकेत तू सुशांत सिंह राजपूतला मिस करणार का?” असा सवाल यावेळी एका फोटोग्राफरने केला. मात्र यावर अंकिता लोखंडेने उत्तर देणं टाळलं आणि ‘छोटू आता मोठा हो’ असं विनोदाने म्हणत आपल्या कारमध्ये बसली.
याआधी अभिनेत्री अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपूतच्या पहिल्या पुण्यतिथीच्या दिवशी एक व्हिडीओ शेअर केला होता. यात सुशांत सिंह राजपूतच्या कित्येक आठवणी तिने शेअर केल्या. यात तिने लिहिलं होतं, “१४ जून…इथवरंच होता आपला प्रवास…पुन्हा एकदा भेटू…याच आठवणींच्यासोबत राहीलेय….तुझ्यावर कायम प्रेम करत राहील…”
गेल्या वर्षी अभिनेता सुशांत सिंग राजपूतचं निधन झालं आणि त्यानंतर या ‘पवित्र रिश्ता’ मालिकेबद्दल जोरदार चर्चा झाली होती. शो मेकर्सनी या मालिकेच्या दुसऱ्या भागावर काम सुरू केलंय. ही मालिका ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ वर पुनरागमन करणार आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेप्रमाणेच ‘पवित्र रिश्ता २.0’ मालिकेला प्रेक्षक किती प्रतिसाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.