बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बऱ्याचदा तिला ट्रोल देखील केले जाते. काही दिवसांपूर्वी कंगनाने शीख समुदायविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. याविरोधात कंगनाला मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. कंगना रणौतविरोधात दाखल केलेल्या तक्रारीप्रकरणी केलेल्या सुनावणीदरम्यान तिला पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
कंगनाने शीख समुदायाविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र हे सर्व दाखल केलेले गुन्हे रद्द करावे या मागणीसाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कंगनाच्या या याचिकेवर सुनावणी करतेवेळी न्यायालयाने तिला २२ डिसेंबरपूर्वी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणाची पुढील सुनावणी २५ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. तोपर्यंत कंगनाला अटक करणार नाही. तसेच तिच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांच्यावतीने न्यायालयात देण्यात आली. तर दुसरीकडे कंगनाही पोलिस तपासात सहकार्य करेल अशी हमी तिच्या वकिलांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा : लारा दत्ताने केले ‘मिस युनिव्हर्स’ विजेत्या हरनाझ संधूचे कौतुक म्हणाली, “आमच्या क्लबमध्ये…”
कंगना नेमकं काय म्हणाली?
दरम्यान कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीत म्हटलं, “खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतील, पण एका महिलेला विसरायला नको. देशाच्या एकमेवर महिला पंतप्रधानाने त्यांना आपल्या चप्पलेखाली चिरडलं होतं. अशावेळी त्यांच्यामुळे या देशाला किती सहन करावं लागलं ते महत्त्वाचं नाही. इंदिरा गांधींनी स्वतःच्या जीवाची किंमत देऊन यांना डासांप्रमाणे चिरडलं. त्यांनी देशाचे तुकडे होऊ दिले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशकं झाली तरी त्यांच्या नावाने हे थरथर कापतात. त्यांना असाच गुरू पाहिजे,” असंही कंगनाने सांगितलं.
हेही वाचा : घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला सँडलने मारहाण, २५ वर्षीय अभिनेत्रीला अटक
तर कंगनाने तिच्या दुसऱ्या एका इंस्टास्टोरीत इंदिरा गांधी यांचा फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं, “देशात खलिस्तानी चळवळ फोफावत असताना इंदिरा गांधी यांची गोष्ट याआधी पेक्षा अधिक कालसुसंगत होत आहे. … लवकरच तुमच्यासाठी आणीबाणी आणेल.” असे ती म्हणाली होती.
कंगना रणौत वक्तव्याविरोधात तक्रार दाखल
कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे.