प्रसारमाध्यमांचे पितळ उघडे पाडण्यासाठी केलेल्या प्रकारामुळे बॉलीवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप सध्या चांगलाच चर्चेत आहे. अनुराग कश्यपने सोमवारी संध्याकाळी ट्विटरवर स्वत:ची छायाचित्रे टाकली होती. या छायाचित्रांमध्ये त्याच्या डाव्या डोळ्याला बँडेज बांधल्याचे दिसत होते. ‘त्यांनी आता माझ्या डोळ्याला प्लॅस्टर केले आहे. एखाद्या पैलवानाशी भांडण झाल्यानंतर अशी अवस्था होते’, असा संदेशही या छायाचित्राबरोबर अनुरागने लिहला होता. त्यामुळे हे ट्विट पाहिल्यानंतर सगळीकडे लगेचच अनुरागचे नक्की कोणाशी आणि कसे भांडण झाले, याविषयी मोठी चर्चा सुरू झाली. फॅन्स आणि प्रसारमाध्यमांमध्ये याबद्दल निरनिराळे तर्क व्यक्त केले जाऊ लागले. परंतु, अनुराग कश्यपला नेमकी हीच गोष्ट अपेक्षित होती. कारण, त्याला या सगळ्यातून स्वत:चा मुद्दा सिद्ध करून दाखवायचा होता. प्रसारमाध्यमांकडून अनेकदा एखाद्या गोष्टीची शहानिशा न करताच बातम्या प्रसिद्ध केल्या जातात हा मुद्दा पटवून देण्यासाठी अनुराग कश्यपने हा सगळा घाट घातला होता.
दरम्यान, या सगळ्यावर प्रसारमाध्यमांमध्ये मनसोक्त चर्चा झाल्यानंतर अनुरागने हा सर्व प्रकार निव्वळ देखावा असल्याचे ट्विटरवरून जाहीर केले. माझ्या डोळ्याची प्रोस्थेटिक्स तपासणी करताना ते छायाचित्र काढले होते. मात्र, हे छायाचित्र पाहून प्रसारमाध्यमांमध्ये लगेच वेगवेगळया बातम्या आणि चर्चा सुरू झाल्या. यापैकी एकानेही हे खरे किंवा खोटे आहे याची उलटतपासणी करण्याचे कष्ट घेतले नाहीत. या अशाच प्रकारांमुळे कोणत्याही चुकीच्या बातम्या किंवा अफवा निर्माण होतात. आजदेखील तेच घडले आणि पाहता मी पैज जिंकलो, असे अनुरागने ट्विटरवर म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anurag kashyap uses bandaged eye to prove a point