दोन ऑस्कर पुरस्कार प्राप्त महान भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान यांना यावेळी मात्र ‘ऑस्कर’ने हुलकावणी दिली. ८७ व्या अॅकॅडमी पुरस्काराच्या ‘बेस्ट ऑरिजनल स्कोअर’ विभागाची नामांकने जाहीर झाली असून, यात रेहमान यांना नामांकन मिळालेले नाही. या विभागाच्या नामांकनात स्थान मिळविण्यासाठीच्या स्पर्धेतील ११४ जणांच्या यादीत रेहमान यांचा हॉलिवूड चित्रपट ‘दी हंड्रेड-फूट जर्नी’ आणि ‘मिलियन डॉलर आर्म’, तसेच सुपरस्टार रजनीकांत याचा अभिनय असलेला ‘कोचाद्दीयान’ चित्रपट होता. परंतु, नामांकन मिळविण्यात त्यांना अपयश आले. यावेळच्या ऑस्कर पुरस्कारासाठी ‘बेस्ट ऑरिजनल स्कोअर’ विभागात ‘दी ग्रॅण्ड बुडापेस्ट हॉटेल’साठी अॅलेक्झांडर डेस्प्लेट, ‘दी लिमिटेशन गेम’साठी अॅलेक्झांडर डेस्प्लेट, ‘इंटरस्टेलर’साठी हान्स झिम्मर, ‘मि. टर्नर’साठी ग्रे येरशॉन आणि ‘दी थ्रॉय ऑफ एव्हरिथिंग’साठी रॉन जोहान्सन यांना नामांकने मिळाली आहेत. नामांकनाची घोषणा होण्यापूर्वी बोलताना आपल्या भावना व्यक्त करताना रेहमान म्हणाले, माझ्या कोणत्याही अपेक्षा नाहीत. देवाने माझ्यावर खूप कृपा केली असून, माझ्या प्रदीर्घ वाटचालीतला हा एक टप्पा आहे.
या आधी रेहमान यांनी २००९ मध्ये ‘बेस्ट ऑरिजनल स्कोअर’ आणि ‘बेस्ट ऑरिजनल साँग’ विभागात डॅनी बॉएल यांच्या ‘स्लमडॉग मिलेनिअर’साठी ऑस्कर पुरस्कार जिंकला होता. डेनी बॉएल यांच्याच ‘१२७ अवर्स’ चित्रटातील त्यांच्या कामासाठी ‘बेस्ट ऑरिजनल स्कोअर’ आणि ‘बेस्ट ऑरिजनल साँग’ विभागात त्यांचे नामांकन झाले होते. यावर्षीच्या ऑस्कर पुरस्काराचे सूत्रसंचालन नील पॅट्रिक हरिस करणार असून, हा पुरस्कार सोहळा 22 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2015 रोजी प्रकाशित
रेहमानला यंदा ‘ऑस्कर’ची हुलकावणी!
दोन ऑस्कर पुरस्कार प्राप्त महान भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान यांना यावेळी मात्र 'ऑस्कर'ने हुलकावणी दिली.
First published on: 16-01-2015 at 02:09 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजनManoranjanहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi CinemaहॉलीवूडHollywood
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ar rahman misses out on oscar nomination