बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सीरिजद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. बुधवारी (२० ऑगस्ट) त्याची पहिली सीरिज लाँच झाली आणि या कार्यक्रमाची सुरुवात शाहरुख खानने केली. यादरम्यान सुपरस्टारच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले, ज्याबद्दल त्याने स्वतः सांगितले की त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. शाहरुखने तो कधी पूर्णपणे बरा होईल हे देखील सांगितले.
‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या लाँच सोहळ्यामध्ये काळ्या रंगाचा ब्लेझर पँट घालून शाहरुख खान खूपच हँडसम दिसत होता. यादरम्यान त्याच्या उजव्या हातावर प्लास्टर दिसले. याबद्दल शाहरुख खान म्हणाला, “तुम्ही लोक विचारण्यापूर्वी मी स्वतः सांगेन की माझ्या हाताला काय झाले. मला दुखापत झाली, माझी एक छोटी शस्त्रक्रिया झाली, ती छोटी शस्त्रक्रिया नव्हती, ती एक थोडी मोठी शस्त्रक्रिया होती. मला बरे होण्यासाठी एक-दोन महिने लागतील.”
याशिवाय ‘जवान’साठी मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दलही तो बोलला. तो म्हणाला, “पण राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात पुरेसा आहे. खरं तर अनेक गोष्टी मी एका हाताने करतो, पण फक्त तुमचे प्रेम स्वीकारताना दुसऱ्या हाताचीही कमतरता जाणवते.” शाहरुखला ‘जवान’ या सिनेमासाठी अलीकडेच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. ३३ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये अभिनेत्याला मिळणारा हा पहिलावहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे.
अलीकडेच समोर आलेल्या ‘मिड डे’च्या रिपोर्टनुसार, एका स्टंटचे शूटिंग करताना शाहरुखच्या खांद्याला दुखापत झाली, त्यामुळे ‘किंग’ चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. तो बरा झाल्यावर शूटिंग पुन्हा सुरू होईल. शाहरुखच्या लेकाची म्हणजेच ‘आर्यन खान’ची या सीरिजमुळे चर्चा आहे. आर्यन खानने त्याचे वडील आणि बहिणीप्रमाणे अभिनयाकडे न वळता दिग्दर्शनाचे क्षेत्र निवडले. दीर्घकाळापासून आर्यन या प्रोजेक्टवर काम करत आहे. तो या सीरिजचा क्रिएटर आणि दिग्दर्शक असून, त्याने बिलाल सिद्दीकी आणि मानव चौहान यांच्यासह सह-लेखक म्हणूनही काम केले आहे. या सीरिजची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंटने केली आहे.
आर्यन खान देखील विनोदांच्या बाबतीत वडील शाहरुख खानसारखाच आहे. आर्यनने प्रथम स्टेजवर म्हटले, “मला थोडी भीती वाटत आहे कारण आज मी पहिल्यांदाच तुम्हा सर्वांसमोर स्टेजवर आलो आहे आणि म्हणूनच मी दोन दिवस आणि तीन रात्री सतत भाषणाचा सराव करत होतो.”
या सीरिजमध्ये बॉबी देओल, लक्ष्य, साहेर बाम्बा, मनोज पाहवा, मोना सिंग, मनीष चौधरी, राघव जुयाल, अन्या सिंग, विक्रांत कोहली आणि गौतमी कपूर यांच्या भूमिका आहेत.