बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणाऱ्या आशा पारेख, वहीदा रहमान आणि हेलेन या तिघी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अंदमानला गेल्या होत्या. पण काही दिवसांपूर्वीच या तिन्ही अभिनेत्रींच्या अंदमान वॅकेशन्सचे फोटोज लीक झाले. या फोटोंमध्ये तिघी अभिनेत्रींनी मिळून भरपूर मस्ती करत वॅकेशन्सची मजा घेताना दिसून आले. त्यानंतर आता आशा पारेख यांनी फोटो लीक होण्यावर नाराजी व्यक्त केली. प्रायव्हेट पर्सन असल्यामुळे आशा पारेख यांनी या प्रकाराला खाजगी आयुष्याबाबत केलेला छळ असल्याचं सांगितलं आहे.
बॉलिवूडमध्ये एके काळी चाहत्यांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री वहीदा रहमान, आशा पारेख आणि हेलेन या तिघीही रिअल लाइफमध्ये खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि नेहमीच त्या एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसून येतात. पण या तिन्ही अभिनेत्री त्यांच्या जीवनाला खाजगीमध्येच ठेवत आल्या आहेत. म्हणूनच या तिघींना त्यांचं अंदमान वॅकेशन देखील खाजगीच ठेवायचं होतं. पण त्यांच्या या वॅकेशन्सचे फोटोज सोशल मीडियावर लीक झाले.
यावर बोलताना आशा पारेख म्हणाल्या, “लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वी आम्ही मार्चमध्ये अंदमानला गेलो होतो, त्याचे हे फोटोज आहेत. आम्हाला वाटलं आमचं हे वॅकेशन खाजगीच असेल…तिथे इतर कोणी आमचे फोटोज घेत आहे, याची कल्पना सुद्धा नाही आली…कदाचित तिथे आलेल्या टूरिस्टपैकी कोणीतरी हे फोटोज काढले असतील…आज काल कोणीही कुणाचेही फोटोज घेऊ शकतो ते ही कुणाच्या परवानगी शिवाय…”
अंदमान वॅकेशन्सवरून मुंबईत परतल्यानंतर लीक झालेले फोटोज पाहून तिघी अभिनेत्री आश्चर्यचकीत झाल्या. यापुढे बोलताना आशा पारेख यांनी सांगितलं, “माझ्यापेक्षा जास्त वहिदा आणि हेलेन या दोघी नाराज झाल्या आहेत. त्या दोघी तर माझ्यापेक्षा जास्त प्रायव्हेट पर्सन आहेत. लोक आमच्या फोटोंना सोशल मीडियावर शेअर करत लिहित होते, आम्ही तिघी ‘दिल चाहता है’ च्या सिक्वेल स्टारप्रमाणेच दिसत आहोत. पण ‘दिल चाहता है’ सारखे का ? ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ सारखे का नाही ?
सोशल मीडियाबद्दल काय म्हणाल्या आशा पारेख ?
फोटो लीक झाल्यानंतर आशा पारेख यांनी सध्याच्या सोशल मीडियाबद्दल आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. त्या म्हणाल्या, “सध्याच्या सोशल मिडियाने लोकांच्या राइट टू प्रायव्हसीला चोरलंय. आधी सगळे ऑटोग्राफ मागत होते, आता सेल्फी मागतात, कोणीही सेल्फी घेऊ शकतं…जर आपण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटूंबासोबत कुठे बाहेर गेलो आणि आपल्यासोबत कुणी असं केलं तर ते खाजगी आयुष्याचा छळ केल्यासारखा प्रकार होतो.”