अभिनेता राम कपूर आणि अभिनेत्री साक्षी तन्वर यांची मुख्य भूमिका असलेली ‘बड़े अच्छे लगते हैं’ या मालिकेला नुकतीच १० वर्ष पूर्ण झाली. या मालिकेला एक दशक लोटून गेलं असलं तरी आजही या मालिकेचे अनेक चाहते दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत. राम आणि साक्षी यांच्या जोडीने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केलं. सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी ही एक मालिका ठरली होती. लवकरच या मालिकेचे दुसरे पर्व येणार असल्याचे सांगितले जात आहे.
या नव्या पर्वासाठी साक्षी तन्वर ऐवजी दिव्यांक त्रिपाठीचा विचारण करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दिव्यांका ‘बड़े अच्छे लगते हैं’ मध्ये दिसणार का ? असा प्रश्न सगळ्याच चाहत्यांना पडला असून आत्ता दिव्यांका त्रिपाठीने याबाबत खुलासा केला आहे.
‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत दिव्यांका म्हणाली की “हो, बड़े अच्छे लगते हैं मालिकेच्या दुसऱ्या पर्वसाठी मला विचारले आहे. पण अजून मी कोणताही निर्णय घेतलेला नाही… आमचे एकदी सहज बोलणे झाले आहे पण चर्चा मात्र सुरु झाल्या आहेत. मी अद्याप मालिकेला होकार दिलेला नाही.” दिव्यांका त्रिपाठी बरोबर नकुल मेहता पण प्रमुख भुमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र नकुलने यावर अजून काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही आहे.
दरम्यान, अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दयाबेन म्हणजेच दिशा वकानीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात होते. या बद्दल बोलताना दिव्यांका म्हणली की “कृपया अशा अफवा पसरावू नका. तारक मेहता ही खूप लोकप्रिय मालिका आहे. यातील सगळीच पत्रा खूप छान काम करतात. सगळ्यांनाच खूप प्रेम मिळत आहे. मी या मालिकेत काम करणार नाही” असे तिने स्पष्ट केले. दिव्यांका त्रिपाठी लवकरच कलर्सवरील स्टंट बेस रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी ११’मध्ये स्टंट करताना दिसणार आहे.