Bharti Singh Opened Up How Much She Earns From Tv and Youtube : भारती सिंग ही हिंदी सिनेसृष्टीमधील एक अभिनेत्री आणि कॉमेडियन आहे. विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे तिच्या कामाचं प्रचंड कौतुक होतं. टीव्हीवर प्रेक्षकांना हसवणाऱ्या भारतीचं आता डिजिटल जगतातही वर्चस्व निर्माण झालं आहे. भारतीचे स्वत:चे दोन यूट्यूब चॅनेलदेखील आहेत.
BHARTI TV या चॅनेलवर ती पॉडकास्ट करते. तर LOL (Life of Limbachiyaa’s) या चॅनेलवर रोज ब्लॉग अपलोड करत असते. अलीकडच्याच एका पॉडकास्टमध्ये भारतीने टीव्ही आणि यूट्यूबद्वारे किती कमाई करते हे सांगितले. भारती फक्त दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. अनेक मुलाखतींमध्ये भारतीने असा उल्लेख केला आहे की, एकेकाळी तिच्याकडे खायला काहीच नव्हते.
तिची आई घरकाम करायची आणि लोक तिला उरलेले अन्न द्यायचे. भारतीचे कुटुंब यावरच जगायचे. आता भारती देशातील टॉप फीमेल कॉमेडियन आणि होस्टपैकी एक बनली आहे. ती करोडो कमावते. भारती सिंगने दोन वर्षांपूर्वी तिचे यूट्यूब चॅनेल लाँच केले होते. भारती सिंगच्या कमाईमध्ये टीव्हीबरोबरच यूट्यूबचाही मोठा वाटा आहे.
राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत भारती सिंगने तिच्या कमाईबद्दल सांगितले होते. भारती म्हणाली होती की, तिच्या एकूण कमाईपैकी ६० टक्के हिस्सा टीव्हीमधून येतो, तर उर्वरित ४० टक्के कमाई ती यूट्यूबमधून करते. “मी टीव्हीवर एका दिवसात जेवढे पैसे कमावते, तेवढे यूट्यूबवर एका महिन्यात कमावते. मला दोन्ही माध्यमं खूप आवडतात”, असेही ती म्हणाली होती. भारतीचं हे यश पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
भारती तिच्या या कमाईचं श्रेय तिचा पती हर्ष लिंबाचियाला देते. सुरुवातीला यूट्यूबबद्दल फारशी माहिती नसतानाही हर्षने तिला या माध्यमाचं महत्त्व पटवून दिलं,असं भारती म्हणालेली. हर्षने तिला सांगितलं होतं की, टीव्हीचं काम कायमस्वरूपी नसतं, त्यामुळे यूट्यूबवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे.
भारतीच्या एका यूट्यूब चॅनेलचे ७.७८ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत, तर दुसऱ्या चॅनेलला ३० लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. भारतीच्या पॉडकास्ट चॅनेलवर तिनं आणि हर्षनं आतापर्यंत मनोरंजन क्षेत्रातील अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.