छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चित शो ‘बिग बॉस १५’ लवकरच लॉंच होतोय. यंदाच्या सीजनमध्ये अनेक बदल दिसून येणार आहेत. हा शो सहा आठवडे आधी ओटीटीवर रिलीज होणारय. या शोमध्ये करण जोहर होस्टिंग करणारेय. यंदाच्या सीजनमध्ये कोण-कोणते कलाकार झळकणार, याबाबत बरीच चर्चा सुरूय. नेहा मार्दा, अर्जुन बिजलानी, दिशा वकानी, दिव्या अग्रवाल, रिया चक्रवर्ती सारख्या कलाकारांच्या नावावर जोरदार चर्चा सुरूय. त्यानंतर आता तीन कलाकारांची नावं समोर येत आहेत.

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार ‘खतरों के खिलाडी ११’ मधली स्पर्धक सना मकबूल ही सुद्धा बिग बॉस १५ मध्ये भाग घेऊ शकते. यासाठी तिची चॅनलसोबत चर्चा सुरू आहे आणि यावर तिने खात्री सुद्धा दिली होती. तर दुसरीकडे ‘हमारी बहू रजनीकांत’ फेम अभिनेत्री रिद्धिमा पंडित सुद्धा या शोमध्ये दिसू शकते. तिसरा कलाकार हा करण नाथ आहे. अभिनेता करण नाथ याला ‘ये दिल है आशिकाना’ या मालिकेतून बरीच लोकप्रियता मिळाली होती. पंजाबी इंडस्ट्रीमधील प्रोड्यूसर राकेश नाथ यांचा हा मुलगा आहे.

माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक सीजनप्रमाणे यंदाच्याही सीजनमध्ये काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न शो च्या मेकर्सचा आहे. टीव्ही क्षेत्रातील काही नवीन नावांसाठी देखील मोठी संधी या शोमध्ये असल्याचं सांगितलं जातंय. यापूर्वी निक्की तंबोळी, असीम रियाज सारख्या कलाकारांना या शो मधून मोठी लोकप्रियता मिळाली होती.

‘बिग बॉस १५’ हा शो आधी ओटीटीवर स्ट्रीम झाल्यानंतर टीव्हीवर ऑन-एअर होणार आहे. या शोमध्ये ओटीटीवर करण जोहर तर टीव्हीवर सलमान खान होस्ट करताना दिसून येणार आहे. यंदाच्या सीजनमध्ये नव नवे ट्विस्ट आणि टर्न्स पहायला मिळणार आहे. शो चे मेकर्स सुरूवातीला १२ स्पर्धकांसोबत वूटवर पहिला भाग लॉंच करतील, असं ही बोललं जातंय. यातील ८ कलाकार हे टीव्ही शो सुरू होण्यापूर्वीच बाहेर होतील. यातील उरलेल्या ४ कलाकारांना सोबत घेऊन टीव्हीवर ग्रॅंड प्रीमियर होणार आहे.